पिंपरी : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने वेगवेगळ्या चार गुन्हयात पाच सराईत गुन्हेगाराना अटक केली आहे. त्यांच्याकडून पिस्तुल, तलवारी यासारखी हत्यारे जप्त केली आहेत.
खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ओंकार विजय मोकाशी (25, रा. पुणे) आणि प्रथम उर्फ पॅडी संदीप तावरे (19, रा. पुणे) या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून 1 गावठी पिस्तुल, एक धारदार कुऱ्हाड आणि ऍक्टिव्हा दुचाकी जप्त केली आहे.
17 जुलै 2021 रोजी चोपडा, जळगावं जिल्हा येथे फायरिंग करून खुनाचा प्रयत्न करून फरार असलेल्या पिंपरी चिंचवड येथील गुन्हेगार आशितोष उर्फ सोन्या संतोष वराडे (21, रा. गावडे भोईर आळी गोंधळे वाडा चिंचवडगाव) याला अटक केली आहे.
चिंचवड पोलिसांनी तडीपार केलेल्या विकी अनिल घोलप (21, रा.लक्ष्मी नगर अपार्टमेंट, पागा तालमी जवळ, चिंचवडगाव) याला अटक केली आहे. तसेच हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या ओंकार उर्फ आण्णा बाळू हजारे (21, रा. वेताळनगर, चिंचवड) याला अटक केली आहे.
गुंडा विरोधी पथकाने यापूर्वीही धडाकेबाज कारवाई केलेल्या आहेत. हातात हत्यारे घेऊन सोशल मीडियावर भाईगिरी करणाऱ्या भाईंची कंबर मोडून त्यांच्याच परीसरात धिंड काढली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने आणि त्यांच्या पथकाने केली आहे.