वाहनांची तोडफोड करणा-‍यांचा जामीन फेटाळला

0

puपुणे  : व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपयांची मागणी करत वाहनांची तोडफोड करणा-‍या चौघांचा जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला. एम. पी. परदेशी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला. किरण प्रकाश घाडगे (वय २५), चंद्रकांत सीताराम गायकवाड (वय २१), मयूर संजय अडागळे (वय २७) आणि सागर प्रकाश घाडगे (वय २८, सर्वजण रा. म्हातोबा नगर झोपडपट्टी, वाकड) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत मारुती साहेबराव काळे (वय ३०, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे.

दहा जून रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास वाकड परिसरात हा प्रकार घडला. काळे हे मित्रांसह गप्पा मारत उभे असताना आरोपींनी त्याठिकाणी येत त्यांकडे महिना दोन हजार रुपये हप्त्याची मागणी केली. काळे यांनी ती देण्यास नकार दिला असताना त्यासह त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करत रिक्षांच्या काचा फोडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात आहेत.

या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास सहायक सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी विरोध केला. आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे असून त्यांनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्यांना जामीन मंजूर झाल्यास ते साथीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, त्यांच्याकडून तक्रारदार व साथीदारांना हानी पोहोचविण्याचे काम होऊ शकते, असा युक्तिवाद अ‍ॅड. मुरळीकर यांनी केला. गुन्ह्याचा तपास वाकड पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक दिपक कादबाने करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.