पुणे : सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण व नवा कामगार कायदा या विरोधात भारतीय मजदूर संघ वगळता सर्व मध्यवर्ती कामगार संघटना, कर्मचारी संघटना, उद्योग तसेच बँक, विमा उद्योगातील कर्मचारी संघटना आणि असंघटित क्षेत्रातील सर्व कामगार संघटनांनी 28 व 29 मार्च रोजी संपाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चौथा शनिवार म्हणून (26 मार्च) रोजी, रविवारी (27 मार्च) आणि 28, 29 मार्च रोजी संप असल्याने सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. राज्यातील सर्व औद्योगिक कामगारही या संपात सहभागी होणार आहेत.
हा संप प्रामुख्याने नवीन कामगार कायद्याच्या व खासगीकरणा विरोधात आहे. सार्वजनिक व खासगी उद्योगांमधून कायमस्वरूपी रिकाम्या जागा न भरता सरसकट कंत्राटी पद्धतीचा अवलंब केला जात आहे त्याला विरोध करण्यासाठी तसेच नवीन कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बँकांतील ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया य तीन संघटना मिळून राज्यातील पाच लाखांहून अधिक बँक कर्मचारी अधिकारी संपात सहभागी होणार आहेत. संपात बँक अधिकाऱ्यांची ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशन सहभागी होत असल्याने स्टेट बँक वगळता इतर सर्व बँकांचे कामकाज ठप्प होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनचे महासचिव देविदार तुळजापूरकर यांनी दिली.