पुणे : मसाले व्यवसाय सुरु करण्याचा बहाणा करुन वारजे माळवाड परिसरातील एका सराफ दुकानाला लागून असलेले दुकान चोरट्यांनी भाड्याने घेतले. सराफ दुकान बंद असताना दोन्ही दुकानाच्या मधील सामाईक भिंतीला भगदाड पाडून संपूर्ण सराफ दुकान लुटून नेण्याचा प्रकार शुक्रवारी भर दिवसा वारज्यात घडला.
चोरट्यांनी तब्बल १ कोटी २३ लाख ७५ हजार २८० रुपयांचे सोने व चांदीचे दागिने चोरुन नेले आहेत. त्यात १ कोटी २३ लाख ५ हजार रुपयांचे २४६५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ७० हजार रुपयांची ५०० ग्रॅम चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.
याप्रकरणी आनंदकुमार चुनीलाल वर्मा (३४, रा. वर्धमान नगरी, कर्वेनगर) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना वारजे येथील एनडीए रोडवरील गणपती माथा परिसरातील शमीम पॅलेस येथील माऊली ज्वेलर्स या दुकानात शुक्रवारी दुपारी अडीच ते पावणे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी माऊली ज्वेलर्स यांच्या दुकानाशेजारील दुकान मसाल्याच्या व्यवसायासाठी भाड्याने घेतले होते. त्या दुकानात फर्निचरचे काम सुरु होते. नवीन दुकान टाकायचे असल्यामुळे काम सुरु असल्याने चोरट्यांचा संशय आला नाही. शुक्रवारी दुपारी माऊली ज्वेलर्स हे दुकान बंद होते. याच संधीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी काम सुरू असल्याचा बहाणा करून दोन दुकानाच्या मध्ये असलेल्या भिंतीला भलेमोठे भगदाड पाडले. तेथून आत प्रवेश करून सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला.
ज्वेलर्सचे मालक वर्मा हे सायंकाळी दुकान उघडण्यासाठी परत आले तेव्हा त्यांना दुकानात चोरी झाल्याचे समजले. घटनेची माहिती मिळताच वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, गुन्हे शाखेची पथक व स्थानिक पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन आरोपींचा शोध सुरु केला आहे.