बनावट नोटा तयार करुन बाजारात आणणारे मोठे रॅकेट गजाआड

32 लाख 67 हजारांच्या नोटा जप्त; धागेदोरे, सातारा, मुंबई, गुजरात मध्ये

0

पिंपरी : बनावट नोटा तयार करुन व्यवहारात आणणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी 32 लाख 67 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. महाराष्ट्रातून तीन, तर गुजरातमधून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

निगडीमधील ओटास्कीम परिसरात एक व्यक्ती नकली नोटा घेऊन येणार असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी गोरख पवार याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन हजार रुपये दराच्या पन्नास बनावट नोटा आढळून आल्या. तसेच त्याच्याकडे असलेल्या दुचाकी (एम एच 13 / डी एल 0285) मध्ये दोन हजार रुपये दराच्या बनावट नोटांचे चार बंडल आढळून आले. त्याच्याकडून पाच लाख 86 हजार रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी गावातील विठ्ठल शेवाळे याला अटक करून तीन लाख 70 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. नालासोपारा पुर्व वसई येथील जितेंद्र पाणीग्रही याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. गुजरात येथील साथीदार आरोपी राजू परमार याला अटक करुन त्याच्याकडून 15 लाख 93 हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या. राजू परमार याने त्याच्याकडील बनावट नोटा जितेंद्रकुमार आणि किरणकुमार यांच्याकडून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी जितेंद्रकुमार आणि किरणकुमार यांच्या घरून त्यांना ताब्यात घेतले.

गोरख दत्तात्रय पवार (30, रा. भाळवणी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), विठ्ठल गजानन शेवाळे (38, रा. ढेबेवाडी, ता. पाटण, जि. सातारा), जितेंद्र रंकनीधी पाणीग्रही (36, रा. नालासोपारा (पुर्व) वसई पालघर), राजू उर्फ रणजीत सिंह खतुबा परमार (38, रा. रानपुर काकरिया चौरा, ता. रानपूर, जि. बोटाद, गुजरात), जितेंद्रकुमार नटवरभाई पटेल (26), किरण कुमार कांतीलाल पटेल (38, दोघे रा. पालनपुर, ता. पालनपुर, जि. बनासकाठा गुजरात) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

24 जून रोजी या तपासाला निगडी पोलिसांनी सुरुवात केली. त्यानंतर सलग तब्बल 18 दिवस 11 जुलै 2021 पर्यंत निगडी पोलिसांनी पुणे, सातारा, मुंबई आणि गुजरातमधील पालनपुर येथे तपास करून दोन हजार रुपये दराच्या 1 हजार 402, पाचशे रुपये दराच्या 929 असा एकूण 32 लाख 67 हजार रुपयांच्या बनावट नोटा तसेच लॅपटॉप, कलर प्रिंटर, दुचाकी असा एकूण 33 लाख 37 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे कृष्णदेव खराडे, पोलीस निरीक्षक (सायबर शाखा) डॉ. संजय तुंगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, उपनिरीक्षक आर. बी. बांबळे, पोलीस कर्मचारी किशोर पढेर, विक्रम जगदाळे, आनंद साळवी, सतीश ढोले, राजू जाधव, विनोद व्होनमाने, राहुल मिसाळ, विजय बोडके रमेश मावस्कर, भूपेंद्र चौधरी, तुषार गेंगजे, विलास केकाण, दिपक जाधवर, अमोल साळुंखे, विकास आवटे, मनीषा पाटील यांच्या पथकाने केली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.