पडळकरांसारखे लोक भाजपने पक्षात ठेवलेत यावरूनच भाजपाची संस्कृती दिसून येते

0
पिंपरी : जेजुरी अहिल्यादेवी होळकर पुतळा अनावरण करण्याच्या मुद्द्यावरून आमदार गोपीचंद पडळकर जेजुरी पोलिस ठाण्यात यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन, पोलीस कामात अडथळा यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

शरद पवार यांच्या सारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून या पुतळ्याचं उद्घाटन होऊ नये, अहिल्यादेवींचं काम बहुजन आणि इतर सगळ्यांसाठी होतं. त्यामुळे पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये, असं सांगत गनिमी काव्यानं जाऊन गोपीचंद पडळकरांनी त्या पुतळ्याचं अनावरण केल आहे. राज्यभरातील शेकडो बहुजन कार्यकर्त्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. तसेच गोपीचंद पडळकर यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पडळकरांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघ, पद वाटप आणि आढावा बैठकिचा कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी या कार्यक्रमात बोलताना वाघेरे म्हणाले कि, पवारसाहेबांसारख्या हिमालयाएवढ्या उंचीच्या व्यक्तिमहत्वावर टीका केली कि प्रसिद्धी मिळते असं होत नाही. पडळकर हे निव्वळ अशा बेअक्कल आणि पोरखेळ गोष्टी फक्त प्रसिद्धीसाठी करत आहेत. पडळकरांच्या स्वपक्षानेही या गोष्टींना दुजोरा दिला आहे. मग पडळकर नक्की कोणाच्या जीवावर एवढ्या उड्या मारतात. पडळकरांसारखे लोक भाजपने पक्षात ठेवलेत यावरूनच भाजपाची संस्कृती दिसून येतेय. असं वाघेरे यावेळी म्हणाले.

पुढे या सर्व घटनेचा वाघेरे यांनी निषेध व्यक्त केला. यापुढे पडळकरांनी आमच्या नेतृत्वावर टीका केल्यास त्यांना पिंपरी चिंचवडमध्ये पाय ठेवून देणार नाही. असही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे अध्यक्ष माधव पाटील, नगरसेविका वैशाली घोडेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस विशाल काळभोर, युनुस शेख, सुप्रित जाधव इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.