पिंपरी : स्वस्त धान्य दुकानातून गरिबांना मिळणाऱ्या धान्याचा काळा बाजार करणाऱ्या मोठ्या टोळीवर पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने कारवाई केली आहे. तिघांना अटक केली असून पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
थेरगाव येथे झालेल्या या कारवाईत एका ट्रकसह २८ लाख २९ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चालक बाळासाहेब भास्कर जाधव (३७, रा. मु. पो. एकलहरे , ता.आंबेगाव , पुणे ), क्लिनर कल्पेश दत्तात्रय कापडी (३३, रा. मु. पो. पारगाव शिंगवे, ता. आंबेगाव, पुणे ), छोटेलाल राधेशाम गुप्ता (५७, रा. परीस कॉलनी, तापकिरनगर, काळेवाडी ) यांना अटक केली आहे. तर सूरज (रा. आकुर्डीगाव ), राहुल बनसोडे (रा. निगडी ), आम्ले (रा. रुपीनगर, निगडी), केंद्रे (रा. यमुनानगर, निगडी ), मावळे (रा. नारायणगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
जाधव , कापडी व गुप्ता यांनी शासकीय रेशनिंग दुकानातील तांदूळ व गहू चढ्या दराने आरोपी मावळे यास विकण्यासाठी जवळ बाळगला. तसेच आरोपी गुप्ता याने सूरज, बनोसाडे व केंद्रे यांच्याकडून रेशनिंगचे तांदूळ व गहू चढ्या दराने काळ्या बाजारात विक्रीसाठी विकत घेतल्याचे समोर आले. या आरोपींकडून ३५८ पोती गहू, ६०५ पोती तांदूळ, एक ट्रक व इतर मुद्देमाल असा एकूण २८ लाख २९ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (ता. १२) पहाटे अडीचच्या सुमारास थेरगाव येथील ग्रीन मॅपल सोसायटीजवळ करण्यात आली.
गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सर्व वाकड पोलिसांकडे सुपूर्त केले. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात आरोपींवर अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.