मुंबई : पत्रकार, अँकर रोहित सरदाना यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. मात्र या दुःखद घटनेनंतर मागे पाहिले असता एप्रिल महिन्यात देशभरात तब्बल 52 पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दिल्लीच्या परसेप्शन स्टडीज संस्थेनं केलेल्या अभ्यासात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान एका वर्षाची आकडेवारी पाहिली तर एप्रिल 2020 ते एप्रिल 2021 या काळात जवळपास 101 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय कोरोनानंतर शरीरात झालेल्या गुंतागुंतीमुळे इतर 50 पत्रकारांचा मृत्यू झाला असल्याचे या संस्थेची माहिती आहे.
एप्रिल महिन्यात झालेल्या मृत्यूंमध्ये उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील पत्रकारांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसल्याचं दिसतंय. गेले वर्षभर देशभरात कोरोनानं हाहा:कार माजवला असतानाची ग्राऊंडवरील नेमकी परिस्थिती मांडण्यासाठी फिल्ड रिपोर्टर्स तर न्यूजरुममध्ये संपादकीय विभागातील लोक दररोज लोकांच्या संपर्कात येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर पत्रकारिता क्षेत्राला मोठा फटका बसल्याचं दिसून येतंय.
देशात अनेक पत्रकार आजही रुग्णालयात कोरोनाशी झुंज देत आहेत. अनेक पत्रकारांवर उपचार व्यवस्थित होत नाहीत. दोनच दिवसांपूर्वी सोलापूर येथील एका कोरोना बाधित पत्रकाराने रुग्णालयात स्वतःवर कश्या प्रकारे उपचार केले जातात आणि डॉक्टर पैश्यांची लूट करुन उपचार देत नसल्याचा व्हिडीओ व्हायरल केला आहे.