राज्याच्या 18 जिल्ह्यातील 1 हजार 166 ग्रामपंतायतींचे बिगुल वाजले

13 ऑक्टोबरला मतदान, 14 ऑक्टोबरला मतमोजणी

0

मुंबई : महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण 18 जिल्ह्यांमधील ग्रामपंतायतींसाठी मोठी घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील 1 हजार 166 ग्रामपंतायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या 1 हजार 166 ग्रामपंतायतींसाठी 13 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच 14 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या विविध विषयांवरुन राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

अमरावतीत लव्ह जिहाद प्रकाराच्या आरोप-प्रत्यारोपांवरुन राजकीय वातावरण तापलं आहे. तर इकडे मुंबईत दसरा मेळाव्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट, भाजप आणि मुख्य शिवसेना यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळतोय. हा संघर्ष पुढचे काही दिवस असाच चालू राहण्याची शक्यता आहे. कारण पुढच्या महिन्यात आता ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

राज्यातील तब्बल 18 जिल्ह्यांसाठी ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. हजारो गावांमध्ये राजकीय रणधुमाळी बघायला मिळणार आहे. त्यामुळे येत्या आगामी काळात प्रत्येक पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

सरपंचाची निवडणूक ही थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 14 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यांनी केली.

निवडणुकीचा कार्यक्रम नेमका कसा असेल?
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तहसीलदार 13 सप्टेंबर 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 21 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे 24 व 25 सप्टेंबर 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत.

नामनिर्देशनपत्रांची छाननी 28 सप्टेंबर 2022 होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत. 

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या: ठाणे: कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, व शहापूर- 79. पालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जवाहार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 व वाडा- 70. रायगड: अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1. रत्नागिरी: मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 व राजापूर- 10. सिंदुदुर्ग: दोडामार्ग- 2 व देवडगड- 2. नाशिक: इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 व पेठ- 71. नंदुरबार: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 व नवापूर- 81. पुणे: मुळशी- 1 व मावळ- 1. सातारा: जावळी- 5, पाटण- 5 व महाबळेश्वर- 6. कोल्हापूर: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 व चंदगड- 1. अमरावती: चिखलदरा- 1. वाशीम: वाशीम- 1. नागपूर: रामटेक- 3, भिवापूर- 6 व कुही- 8. वर्धा: वर्धा- 2 व आर्वी- 7. चंद्रपूर: भद्रवाती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 व ब्रह्मपुरी- 1. भंडारा: तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 व साकोली- 1. गोंदिया: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 व अर्जुनी मोर- 2. गडचिरोली: चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 व गडचिरोली- 1. एकूण- 1,166.

Leave A Reply

Your email address will not be published.