केंद्र सरकार ओला, उबेर, भांडवलदार कंपन्यांना पाठीशी घालत आहे – बाबा कांबळे
बेकायदेशीर दुचाकी विरोधात रिक्षा चालक मालकांचे आंदोलन
पिंपरी : रिक्षा चालकांचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असताना ते सोडविण्याऐवजी त्यात आणखीन भर घालण्याचे काम राज्य व केंद्र सरकार करत आहे. बेकायदेशीर दुचाकी आणून रिक्षा चालकांच्या संकटात आणखीन भर घालण्याचे काम सरकारने केले आहे. तीन चाकाच्या सरकारचे रिक्षा चालकाकांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केला. तर केंद्र सरकार ओला, उबेर, भांडवलदार कंपन्यांना पाठीशी घालत असल्याचेही बाबा कांबळे म्हणाले.
बेकायदेशीर दुचाकी बंद करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी पुणे व पिंपरीतील रिक्षा चालक मालकांनी पुणे आरटीओ कार्यालवर आंदोलन छेडले. सकाळी दहा वाजता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. या वेळी बाबा कांबळे बोलत होते.
या वेळी बाळासाहेब ढवळे, लक्ष्मण शेलार, अनिल शिरसाट, रवींद्र लंके, संजय दौंडकर, धनंजय कुदळे, जाफर शेख, तुषार लोंढे, सुरेश सोनवणे, अविनाश जोगदंड, दीपक कुसळकर,प्रदीप आहिरे, हे उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड पुणे शहरामध्ये बेकायदेशीरपणे दुचाकी सुरु असून ओला उबेरच्या या बेकायदेशीर ॲप मुळे रिक्षा व्यवसायावर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाला आहे. रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधामध्ये रिक्षा चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्याच्याच निषेधार्थ काही संघटनांनी बेमुदत रिक्षा बंदची हाक दिली. मात्र ही हाक म्हणजे अत्यंत चुकीची आहे. कोविडमुळे अगोदरच त्रस्त व मेटाकुटीला आलेल्या रिक्षाचालकांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. रिक्षा चालकांचे हप्ते थकले असून त्यांना हप्ते भरणे ही अवघड झाले आहे. आपला उदरनिर्वाह कसा करायचा, मुलांचे शिक्षण, शाळा, महाविद्यालयाच्या फी अशा असंख्य प्रश्नांनी रिक्षा चालक त्रस्त आहेत. या परिस्थितीमध्ये रिक्षा बंद करून परत त्यांना आर्थिक फटका बसेल, असे बाबा कांबळे म्हणाले.
केंद्र व राज्य सरकार हे गरिबांना एकमेकांमध्ये भांडवत आहे. उद्योजकांना मदत करत आहे. रिक्षा चालकांवरती अन्याय करत आहे. यामुळे बेकायदेशीर दुचाकी बंद झाली पाहिजे. रिक्षाचालक मालकांचे कल्याणकारी मंडळ स्थापन झाले पाहिजे. वाढिव दंड रद्द झाला पाहिजे. मुक्त रिक्षा परवाना बंद झाला पाहिजे.
यासह इतर विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले. अनेक भागात रिक्षा चालकांना मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. ही गुंडगिरी खपवून घेणार नसल्याचे बाबा कांबळे म्हणाले. तसेच रिक्षा चालकांचे प्रश्न त्वरित न सोडविल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.