नवी दिल्ली : यंदाच्या सादर झालेल्या अर्थसंकल्पावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निर्गुंतवणूक योजनेतून लाखो कोटी रुपये केंद्र सरकार उभारणार असल्याची घोषणा केली होती. याचाच एक भाग म्हणून आता खासगी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या Axis Bank मधील आपला काही हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. यामधून केंद्र सरकारला ४ हजार कोटी रुपये मिळतील, असे म्हटले जात आहे.
केंद्र सरकारनं अॅक्सिस बँकेतील १.९५ टक्के शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला आहे. अॅक्सिस बँकेतील सुमारे ५.८ कोटी शेअर्स केंद्र सरकार विकणार आहे. स्पेसिफाइड अंडरटेकिंग ऑफ द यूनिट ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच SUUTI च्या माध्यमातून ही शेअर्स विक्री केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. मंगळवारी बाजार बंद झाला तेव्हा शेअरची किंमत ७११ रुपये होती, असे सांगितले जात आहे.
केंद्र सरकारने विक्रीला काढलेल्या शेअर्सची विक्री झाल्यानतंर अॅक्सिस बँकेच्या शेअर्सची किंतम वाढू शकेल, असे सांगितले जात आहे. अॅक्सिस बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १९ मे रोजी नॉन रिटेल गुंतवणूकदार आणि २० मे रोजी रिटेल गुंतवणूकदार शेअर्स खरेदसाठी बोली लावू शकतात. केंद्र सरकारने विक्रीला काढलेल्या एकूण शेअर्स पैकी चौथा भाग हा रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. ओवर सब्सक्रिप्शन झाल्यानंतर २२ दशलक्ष शेअर्स विकले जातील. यामधील समभागांचे प्रमाण ०.७४ टक्के आहे, अशी माहिती मिळाली आहे.
केंद्र सरकारने गेल्या वर्षीही अॅक्सिस बँकेतील एक कोटी शेअर्स ६०० कोटी रुपयांना विकले होते. शेअर्स विक्रीचे काम SUUTI द्वारे पूर्ण करण्यात आले होते. ३१ मार्चपर्यंतच्या माहितीनुसार, अॅक्सिस बँकेच्या SUUTI चा वाटा ३.४५ टक्के आहे. आता केंद्र सरकारने शेअर्स विक्री केल्यानंतर हा वाटा १.५ टक्के राहील, असे सांगितले जात आहे.