पिंपरीः पिंपरी-चिंचवडमध्ये गेले वर्षभर दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. या प्रश्नाचा संदर्भ पकडून राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रविवारी (ता.१७) पिंपरी-चिंचवड पालिकेतील सत्ताधारी भाजपवर तोफ डागली. भ्रष्टाचारमुक्त असलेली गेल्या साडेचार वर्षातील दहा कामे दाखवा, मी शहरात पाऊल ठेवणार नाही,असे आव्हान त्यांनी भाजपला दिले. त्यातून त्यांनी जणूकाही पालिकेतील प्रत्येक कामात भ्रष्टाचार झाल्याचाच हल्लाबोल केला.
रहाटणी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात डॉ.खा. कोल्हे बोलत होते. यानिमित्ताने शरद पवार यांनी आगामी पिंपरी पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्याची पुनरावृत्ती शहराचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या डॉ. खा.कोल्हेंनीही केली. त्यांनी, तर एक पाऊल पुढे जात भ्रष्टाचार न झालेली दहा जनहिताची कामे दाखवा,असे आव्हानच पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी भाजपला दिले.
शहराचे दोन भाग झालेत, ही मक्तेदारी कोणाची व कोणासाठी अशी विचारणा त्यांनी करीत शहरातील भाजपच्या दोन्ही कारभारी आमदारांना लक्ष्य केलं. २०१७ च्या पिंपरी महापालिका निवडणुकीसाठी देण्यात आलेली आश्वासने ही गाजरेच ठरल्याचा हल्लाबोल त्यांनी भाजप व ही आश्वासने दिलेले त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
केंद्र सरकार व त्यातही मोदी,शहांवरही खा. कोल्हेनी यावेळी जोरदार टीका केली. मूठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी केंद्र सरकार काम करीत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. उत्तरप्रदेशात शेतकरी आंदोलनात केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाने मोटार घुसवून चार शेतकऱ्यांचा बळी घेतला. त्यावर मोदी-शहा अजून गप्प आहेत, याबद्दल त्यांनी आश्चर्य व खेदही व्यक्त केला. शेतकरीच नाही, कामगार,कष्टकरी यांचाही आवाज दडपण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरु आहे.कोरोना लस मोफत देण्यासाठी इंधन दरवाढ केल्याचे सांगितले जात आहे. मग,गेल्या ७० वर्षात भाजपेतर सरकारे केंद्रात असताना पोलिओ, गोवर आदी लसी मोफत दिल्या. त्यावेळी अशी ही इंधन दरवाढ झाली नाही,याकडे त्यांनी लक्ष वेधले. २०१७ च्या अगोदर म्हणजे राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड म्हणजे विकास होता. आता भाजप राजवटीत या शहराचे नाव राज्यस्थानमध्ये कशासाठी चर्चेत आहे, घेतले जात आहे,याचा शोध घ्यावा,असे आवाहन त्यांनी दिले.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही यावेळी केंद्र सरकारवर आसूड ओढले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला नरेंद्र मोदींनी दाखविलेली गोड स्वप्ने भुलभुलैय्या ठरल्याची टीका त्यांनी केली.तसेच विधानसभेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनांचीही पूर्तता झाली नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गतवेळी पिंपरी पालिका आपल्या हातातून का निसटली, याचेही आत्मचिंतन करा, असा घरचा आहेर त्यांनी पक्षाच्या शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.
तर, साहेबांच्या येण्याने नवचैतन्य आले स्फूर्ती मिळाली आहे. त्यामुळे पालिकेत पुन्हा सत्तेत येण्यासाठी कार्यकर्ता आता पेटून उठला आहे, असे शहराध्यक्ष संजोग वाघेरे -पाटील म्हणाले. लायकी नसतानाही ज्यांना मोठ्ठ केलं, ती जितराबं तिकडे (भाजपात) गेली, या शब्दांत माजी आमदार विलास लांडे-पाटील यांनी गत महापालिका निवडणुकीच्या वेळी पक्ष सोडलेल्यांची व त्यातही सध्याच्या शहरातील भाजपच्या दोन्ही आमदारांची संभावना केली. भाजपची बांडगुळं असे शब्द त्यांच्यासाठी त्यांनी वापरले. साहेब (शरद पवार), तुम्ही महिन्यातून फक्त एकदा या, पालिका तुमच्या पायाशी घालतो, असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला