पिंपरी : पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतीच्या माजी सदस्याच्या पोलिस उपनिरीक्षकाने कानशिलात लगावली. या प्रकाराची दखल घेत पोलीस आयुक्तांनी तत्काळ त्या उपनिरिक्षकाची बदली करण्यात आली. हा प्रकार मंगळवारी (दि. 16) सकाळी हिंजवडी येथे घडला.
पंडित आहिरे असे कानशिलात लागवणाऱ्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी श्रीकांत दिलीप जाधव यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे तक्रार दिली आहे.
तक्रारदार जाधव हे हिंजवडी गावठाण येथील अंतर्गत रस्ता बंद करण्याबाबतचे निवेदन घेऊन मंगळवारी पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळी उपनिरीक्षक आहिरे त्या ठिकाणी उपस्थित होते. निवेदन पाहिल्यानंतर त्यांनी ‘ए चल निघ सूट’ असे बोलून जाधव यांना तेथून जाण्यास सांगितले.
त्यावर जाधव यांनी ”माझी काय चूक आहे, तुम्ही मला का ओरडता, असा जाब विचारला. त्यामुळे चिडलेल्या आहिरे यांनी त्यांच्या कानशिलात लगावल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याबाबत माहिती मिळताच हिंजवडीच्या आजी -माजी पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यावेळी वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून आहिरे यांच्यावर कारवाईचे आश्वासन दिले.
त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे देखील तक्रार केली. त्यांनी देखील घटनेची गंभीर दखल घेत तत्काळ बदली करण्यात आली आहे.