पुणे : कामगारांनी केलेल्या कष्टाचे पैसे खर्च करून ठेकेदारांनीच लुटमारीचा बनाव करीत पोलिसांच्या डोळयात धूळ फेकली. मात्र, चाणाक्ष पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून ठेकेदाराचे भांडाफोड केली आहे. खोटी फिर्याद दिल्यामुळे भाऊसाहेब लाला वाळुंजकर या ठेकेदाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हांडेवाडी रस्त्यावरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून जवळ असलेले ७० हजार रुपये लुटून नेल्याची तक्रार भाऊसाहेब यांनी २० डिसेंबरला कोंढवा पोलिस ठाण्यात दिली होती. कोंढवा पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत तपास सुरू केला होता. भाउसाहेब यांनी सांगितलेल्या वर्णनावरून आरोपीचा शोध घेतला जात होता. हेल्मेट घालून आलेल्या आरोपींनी लुबाडल्याचे त्यांनी सांगितले होते.
त्यानुसार पोलिसांनी परिसरातील २० ते २५ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी त्यामध्ये फक्त भाउसाहेब दुचाकीवरून जाताना दिसत होते. पण त्यांनी वर्णन केलेल्या आरोपी कोणतेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत नव्हते. त्यामुळे पोलिसांना भाउसाहेब यांच्यावरच संशय आला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी कामगाराच्या पगारासाठी बांधकाम व्यावसायिक आठवड्याला वाळुंजकर यांच्याजवळ पैसे देत होता. मात्र, पैसे खर्च झाल्यामुळे खोटी तक्रार दिल्याची कबुली त्यांनी दिली.