महावितरणच्या महिला कर्मचा-याला कोंडणा-याचा जामीन न्यायालयाने फेटाळला

१४ दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी

0

पुणे : बिल थकल्याने वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या महिला कर्मचा-‍याला मीटर रुममध्ये कोंडण्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्याची १४ दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

सलीम बशीर सय्यद (वय ४१, रा. सुखनिवास, एस आर ए बिल्डिंग, मंगळवार पेठ) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी माधुरी सुनील कुलसंगे (वय २८, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवार पेठेतील सुखनिवास या एस. आर. ए. इमारतीत मंगळवारी (ता. १५) हा प्रकार घडला. सय्यद याचे ११ हजार ४८१ रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने फिर्यादी यांना दिलेल्या कामानुसार त्यांनी आरोपीच्या घरातील विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे आरोपी चिडून मीटर रूमच्या दरवाज्यासमोरुन फिर्यादींच्या अंगावर धावत आला. ‘आमची कट केलेली लाइट चालू कर, नाही तर मी तुला येथेच रुममध्ये कोंडून ठेवीन,’ असे धमकावले.

त्या समजावून सांगत असताना मीटर रूमची बाहेरून कडी लावून फिर्यादी यांना आत कोंडून ठेवले. त्यानंतर फिर्यादी यांनी कार्यालयातील ऑफिस असिस्टंट शैलेश धुमाळ यांना फोन करून बोलावून घेतले. धुमाळ यांनी त्यांची सुटका केली. सय्यद याने त्यांनाही शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यानंतर त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास सरकारी वकील किरण बेंडभर यांनी विरोध केला.

आरोपीने एका सरकारी कर्मचा-याच्या कामात अडथळा आणून त्यांना कोंडून ठेवले. हा गंभीर अपराध आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. बेंडभर यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.