रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार

मुंबर्इ उच्च न्यायालयाच्या सूचना

0

पुणे : कोरोनाचा प्रसार थांबण्यासाठी राज्यातील सर्व प्रकारच्या न्यायालयांना चार दिवसांची अतिरिक्त सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे रविवारपर्यंत न्यायालयीन कामकाज बंद राहणार आहे. मात्र सुटीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार आहे.

राज्यात कोरोना बाधित रुग्‍णांची संख्या वाढत असल्याने निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील न्यायालयीन कामकाजाच्या वेळा देखील कमी करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेण्यात आला आहे. दरम्यान या आठवड्यात मंगळवार आणि बुधवारी असे दोन दिवस सुटी (गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती) असल्याने चारच दिवस कामकाज होणार होते. त्यामुळे उर्वरित चार दिवस देखील कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत मुंबर्इ उच्च न्यायालयाने आदेश जारी केले आहेत.

त्यानुसार सोमवार (ता.१२), गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी (ता. १५ ते १७) देखील न्यायालयांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आता थेट सोमवारी (१९) नियमित सुनावणी होणार आहे.
दरम्यान या सुटीच्या दिवशी तारखा असलेल्या दाव्यांना पुढील तारखा देण्यात आल्या आहेत. तसेच चार अतिरिक्त सुट्या दिल्याने चार दिवसांचे कामकाज पुढे भरून काढायचे आहे. स्थानिक परिस्थितीनुसार चार दिवस अतिरिक्त कामकाज करण्यात यावे, असे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशात नमूद आहे. कोरोनाची साखळी तुटावी म्हणून उच्च न्यायालयाने न्यायालयास सुटी दिली आहे. त्यामुळे आपण घरी सुरक्षित राहावे. न्यायालयीन कामकाजासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन पुणे बार असोसिएशन आणि दी पुणे फॅमिली कोर्ट असोसिएशनने वकील व पक्षकारांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.