मुंबई : आपल्या धडाकेबाज आणि प्रामाणिक कामांसाठी प्रसिध्द असलेले, सत्ताधारी, राजकीय पदाधिकारी, ठेकेदार यांना लांब ठेवत सर्व सामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या ‘आयएएस’ तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा आरोग्य विभागातून बदली झाली आहे.
आक्रमक कार्यशैली तसेच तितकेच शिस्तबद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांची अनेकदा बदली झाली आहे. तुकाराम मुंढे यांची 16 वर्षाच्या सेवेत तब्बल 19 वेळा वेळा बदली झाली आहे. कर्मचाऱ्यांना कडक शिस्त लावण्याच्या हेतुनं मुंढे जी पावले उचलतात, तीच बदल्यासाठी कारण असल्याची चर्चा सुरु आहे. तुकाराम मुंढे 2005 सालच्या आयएसएस बॅचचे अधिकारी आहेत.
तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे, पण अद्याप नव्या जागेवर पोस्टिंग नाही. तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा विक्रमच झालाय, असं म्हटल्यास वावगं वाटू नये. कारण, 16 वर्षात त्यांची तब्बल 19 वेळा बदली झाली आहे. दोन महिन्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांची बदली झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची बदली करण्यात आली आहे. आतापर्यंत ज्या-ज्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली आहे त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. ते ज्या ठिकाणी काम करायचे त्या ठिकाणच्या नागरिकांत त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत होतं. सामान्य लोकांना जरी तुकाराम मुंढेची कार्यशैली आवडत असली तरी सत्ताधारी आणि राजकारण्यांसाठी मात्र ती अडचणीची ठरत असल्याचं दिसत होतं. सत्ताधारी आणि विरोधकही तुकाराम मुंढेच्या विरोधात एकत्र यायचे. परिणामी तुकाराम मुंढेंची बदली व्हायची. असे असले तरी नव्या ठिकाणी रुजू झालेले तुकाराम मुंढेंनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमध्ये कोणताही बदल केला नाही हे विशेष. दरम्यान, आयएएस अथवा आयपीएस अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी किमान दोन ते अडीच वर्ष सेवा बजावावी, पण तुकाराम मुंढे याला अपवाद ठरत आहेत. पाहूयात तुकाराम मुंढे यांची आतापर्यंत कुठे कुठे आणि कधी कधी बदली झाली?
ऑगस्ट 2005 – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर
सप्टेंबर 2007 – उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग
जानेवारी 2008 – सीईओ, जिल्हा परिषद नागपूर
मार्च 2009 – आयुक्त, आदिवासी विभाग
जुलै 2009 – सीईओ, वाशिम
जून 2010 – सीईओ, कल्याण
जून 2011 – जिल्हाधिकारी, जालना
सप्टेंबर 2012 – विक्रीकर सहआयुक्त मुंबई
नोव्हेंबर 2014 – सोलापूर जिल्हाधिकारी
मे 2016 – आयुक्त, नवी मुंबई महापालिका
मार्च 2017 – मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे
फेब्रुवारी 2018 – आयुक्त, नाशिक महापालिका
नोव्हेंबर 2018 – सहसचिव, नियोजन
डिसेंबर 2018 -प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई
जानेवारी 2020 – आयुक्त, नागपूर महापालिका
ऑगस्ट 2020 – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
जानेवारी 2021 – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत
सप्टेंबर – 2022 – आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान
29 नोव्हेंबर 2022 – कोणत्या विभागात बदली झाली याबाबत अजुनही स्पष्टता नाही.