मुंबई : मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लढवण्याबाबतचा निर्णय महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत.
नुकत्याच होऊन गेलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला भारीभक्कम विजय मिळाला. त्यातून विरोधी पक्ष भाजपाला चांगलाच धक्का मिळाला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष एकत्र येऊन मुंबई महापालिकेची निवडणूक लढतील , याचा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे नेते करताना दिसत आहेत.
मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र येऊन लढण्याचे ठरले आहे, असेही मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनीदेखील सांगितले आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षसंघटना बांधणीच्या कामास गेल्या फेब्रुवारीपासून आम्ही सुरुवात केली होती. त्यासाठी सभा सुरू झाल्या होत्या, परंतु करोनामुळे ते काम थांबले. आता सभा, बैठका पुन्हा सुरू झाल्या आहेत, नवाब मलिक यांनी सांगितले.