याप्रकरणी वानवडी पोलिसांनी महिला डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डॉ. विद्या धनंजय गोंद्रस (रा. कोंडाई मारूती इमारत, वानवडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. तर, याप्रकरणी सुषमा जाधव (58) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुषमा कंट्रोल ऑफ डिफेन्स अकाउंटमध्ये ऑडिटर आहेत. 2017 मध्ये एका मैत्रिणीच्या माध्यमातून त्यांची डॉ. विद्यासोबत ओळख झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी सुषमा यांना गुडखेदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्या कोंढवा बुद्रूकमधील डॉ . विद्या यांच्या दवाखान्यात गेल्या होत्या. नंतर जूनमध्ये पुन्हा सुषमा यांनी डॉ. विद्या यांच्याशी संपर्क साधला पण आपण जानेवारी 2020 पासून दवाखाना बंद करून कॅनडातील आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक फ्रॅन्चाईसी घेतली असून त्या औषधांमुळे अनेकांना गुण आल्याचे डॉ . विद्या यांनी त्यांना सांगितले.
डॉ. विद्याच्या सांगण्यानुसार सुषमाने नाभीचा फोटो काढून पाठवला. त्यावर डॉ. विद्याने सुषमाला लिव्हर असायटीस झाल्याचे सांगितले. तुमच्या पोटात कॅन्सरची गाठ आहे, पोटात पाणी आहे, असे सांगत सुषमाच्या मनात भीती निर्माण केली आणि उपचाराच्या नावाखाली वेगवेगळ्या गोळ्या देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरूवात केली. पण आजारपणाचे कोणतेही ठोस कागदपत्रे किंवा रिपोर्ट त्यांनी दिले नाही.
फिर्यादीला पैशांची चणचण जाणनू लागल्याने त्यांनी वकील असलेल्या पतीकडे पैसे मागितले. त्यावर पतीने पैशाबाबत विचारणा केली असता, त्यांनी उपचाराबाबत माहिती दिली. पतीने आजारपणाचा रिपोर्ट मागितला त्यावर फिर्यादीने डॉक्टरशी संपर्क साधला, पण पुन्हा त्यांनी रिपोर्ट देण्यास नकार दर्शवला. नंतर फिर्यादीच्या पतीने 3 डिसेंबर रोजी डॉ. विद्या यांची भेट घेतली पण त्यावेळीही त्यांनी उपचार पूर्ण होईपर्यंत रिपोर्ट देता येणार नाहीत असं सांगितलं. अखेर फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर डॉ. विद्या गोंद्रसविरोधात त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला.