पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील श्वान पथकाला मिळणार बळ

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात एक वर्षापूर्वी स्थापन झालेल्या श्वान पथकाला अधिकची कुमक मिळणार आहे. अमली पदार्थ शोध व गुन्हे शोधा करिता नऊ पदे भरण्याबाबत राज्याच्या गृह विभागाने मान्यता दिली आहे. गृह विभागाचे उपसचिव राजेंद्र भालवणे यांनी याबाबत अध्यादेश काढला आहे.

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात श्वान पथक आणि बॉम्ब शोधक नाशक पथक (बीडीडीएस) स्थापन करण्यासाठी अनुभवी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी पोलीस आयुक्तांकडून गृहमंत्रालय आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात होता. मागील वर्षी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या प्रयत्नांना यश आले. पोलीस महासंचालकांनी पुणे शहर पोलीस दलातील दोन श्वान पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांना देण्याबाबत सीआयडीला आदेश दिले. त्यानुसार सीआयडीने सिम्बा आणि जेम्स या दोघांना पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांकडे पाठवले.

अमली पदार्थ शोध पथकाकरिता पोलीस हवालदार दोन पदे व पोलीस शिपाई दोन पदे अशी एकूण चार पदे. तर गुन्हे शोध पथका करिता पोलीस उपनिरीक्षक एक पद, पोलीस हवालदार दोन पदे व पोलीस शिपाई दोन पदे अशी पाच पदे. दोन पथकात एकूण नऊ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर बाह्य यंत्रणेद्वारे सफाई कामगार हे एक पद भरले जाणार आहे. या माध्यमातून श्वान पथकाला बळ मिळणार आहे.

पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या सिम्बाचे वय आठ वर्ष आहे. त्याचे प्रशिक्षण राजस्थान येथे झाले आहे. तर जेम्सचे वय पाच वर्ष असून त्याचे प्रशिक्षण हरियाणा येथे झाले आहे. श्वानांचा पोलीस दलात गुन्हे शोधक, अंमली पदार्थ शोधक आणि बॉम्बशोधक या तीन प्रकारे वापर केला जातो. खून, दरोडा, घरफोडी, हरवलेली आणि अपहरण झालेली व्यक्ती शोधण्यासाठी श्वानांची मदत होते. कोकेन, गांजा, अफू आणि इतर अंमली पदार्थ शोधण्यासाठी देखील श्वानांचा वापर होतो. गर्दीच्या ठिकाणी, अति महत्वाच्या व्यक्तींच्या वाहनांमध्ये, जमिनीत पुरलेली स्फोटके शोधण्यासाठीही श्वान उपयोगी पडतात. सिम्बा हा गुन्हे शोधक म्हणून काम पाहत आहेत. तर जेम्स स्फोटके शोधण्याचे काम करत आहे.

एका श्वानासाठी दोन हँडलर

श्वान पथकात दाखल होणा-या प्रत्येक श्वानासाठी दोन हँडलर असतात. जो हँडलर त्यांना प्रशिक्षण देतो, तोच त्या श्वानाच्या सोबत कायम राहतो. प्रत्येक हॅँडलर त्याची 12-12 तास काळजी घेतात. त्यांचे डाएट, व्यायाम, प्रशिक्षण, औषधे अशा प्रत्येक गोष्टीची काळजी हे हॅँडलर घेतात. हे श्वान केवळ आपल्या हॅँडलरचेच ऐकतात. त्यामुळे हे श्वान जिथे जातात तिथे त्यांचे हॅँडलर सावलीप्रमाणे सोबत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.