मुंबई ः दिल्लीतील आंदोलनावरून शिवसेनेने आपल्या सामनातून भाजपा केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. शरद पवार, प्रकाशसिंग बादल यांच्यासारख्या मान्यवर नेत्यांची चर्चा करण्याचे सौजन्य दाखविले असते, तर आजच्या कठीण काळात जी सरकारती कोंडी झाली आहे ती थोडी सैल झाली असती. आज जी परिस्थिती बिघडत चालली, ही सरकारच्याच कर्माची फळे आहेत”, अशा शब्दांत शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधलेला आहे.
”दिल्लीतील शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळण्यास केंद्र सरकारच कारणीभूत आहे. समाजात जाती-धर्माची फूट पाडून निवडणुका जिंकणे सोपं आहे. पण, दिल्लीच्या वेशीवर थडकलेल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीत फूट पाडणे जमत नसल्याने सरकार कोंडीत सापडलं आहे. सरकारमध्ये निवडणुका जिंकून देणारे आणि विजय विकत घेणारे लोक आहे. पण, शेतकऱ्यांवर आस्मानी-सुलतानी संकट, बेरोजगारी अशा आव्हानांना दोन हात करण्याऱ्या तज्ज्ञांची कमतरता आहे,” असं मार्मिक भाष्य सामनाच्या अग्रालेखातून करण्यात आलं आहे.
मागील ९-१० दिवसांपासून चिवटपणे केंद्राच्या विरोधात शेतकऱ्यांनी दिल्ली आंदोलन छेडले आहे. केंद्राने केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनात हजेरी लावलेली आहे. केंद्राने आतापर्यंत चार वेळा बैठका घेतल्या, मात्र त्यामध्ये यश आलेले नाही.