पुणे : कै. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून नऱ्हे, आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते येत्या रविवारी होणार आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांनी स्थापन केलेल्या “महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’ या संस्थेचे विश्वस्त जगदीश कदम यांनी या संदर्भात माहिती दिली.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित असतील, अशी माहितीही कदम यांनी दिली. 1998-99 मध्ये शिवसृष्टीच्या प्रकल्पाला सुरुवात झाली होती. सदर प्रकल्प हा आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प असून, पहिल्या टप्प्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या “सरकारवाडा’चे लोकार्पण शहा करणार आहेत.