पिंपरी : एका ‘बिल्डर’ने पाऊस येत असल्याने मुलाला घेऊन सोसायटी गेटच्या बाजूला थांबलेल्या सदनिकाधारकाचा गळा पकडून, जमिनीवर पाडून, लाथाबुक्याने मारहाण केली. हा प्रकार वाकड येथील ९ अव्ह्यूनिव सोसायटीच्या गेटसमोर १६ जुलै रोजी दुपारी दीड वाजता घडला आहे.
या प्रकरणी अनंत आनंदकुमार सिंग (३८, रा. ९ अव्ह्यूनिव सोसायटी, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. तर बिल्डर नितीन कलाटे (३७, वास्तूकल्प प्रोमोटर्स अँड बिल्डिंग) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; अनंत यांचा मुलगा अक्षज हा १६ जुलै रोजी दुपारी १:३० वाजता शाळेतुन येत होता. सोसायटीच्या गेटसमोर आल्यानंतर पाऊस आल्याने अनंत, मुलगा अक्षज आणि पत्नी हे बाजूच्या कॅफे कॉफी डे च्या कठड्यात उभा होते.
दरम्यान नितीन कलाटे पाठीमागून आला व त्याने अनंत यांना बाजूला व्हायला सांगितले. त्यावेळी पाऊस येत असल्याने थांबलो असल्याचे अनंत यांनी सांगितले असता नितीन याने त्यांचा गळा पकडून जोराने धक्का दिला. त्यामुळे अनंत कठड्यावर पडले आणि त्यांच्या डोक्याला मार लागला व ते जमिनीवर पडले. त्यानंतर लाथा बुक्याने मारहाण करुन अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत २३ जुलै रोजी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जखमी अनंत यांच्यावर उपचार सुरु असल्याने गुन्हा उशिरा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास वाकड पोलीस करत आहेत.