कुरुळीतील कंपनीत दरोडा घालणारी टोळी गजाआड; 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पिंपरी : सुरक्षा रक्षकाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून कंपनीत दरोडा घालणाऱ्या टोळीला म्हाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. नऊ जणांना अटक करुन त्यांच्याकडून 33 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रोहन विजय सूर्यवंशी (28, रा. कासारवाडी), राहुल अंकुश क्षीरसागर (21, रा. काळा खडक वाकड), रतन महादेव दनाने (19, रा. तळेगाव दाभाडे), अन्सार जुल्फीकार खान (25, रा. दापोडी), अब्दुल सत्तार करिम (23, रा. दापोडी), अरबाज रईस शेख (20, रा. दापोडी), मीना अंकुश क्षीरसागर (40, रा. काळा खडक, वाकड), अर्जुन मोहनलाल भट (24, रा. चिखली), विद्या मनोज मगर (23, रा. तळेगाव दाभाडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. किरण गिरी, हर्षद खान हे दोघेजण सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जून रोजी मध्यरात्री कुरुळी येथील व्ही.टेक इंडस्ट्रीज इंडीया प्रा. लि. या कंपनीच्या कंपाऊंड वॉलवरुन कंपनीच्या आवारात प्रवेश केला. दरोडेखोरांनी हातामध्ये चाकू, कटावणीसह प्रवेश करून सिक्युरिटी गार्डना चाकूचा धाक दाखविला आणि तोंडावर मिरची पुड टाकून हाताने मारहाण करून अंगावर चादर टाकून डांबून ठेवले.

दरोडेखोरांनी कंपनीमधील तांबे, पितळ या धातुचे टर्मिनल, लग्ज, वायरिंग, हार्नेस असे स्पेअर पार्ट आणि सिक्युरिटी गार्डचे तिन मोबाईल फोन, असा एकूण 25 लाख 87 हजार 247 रुपयांचा मुद्देमाल दरोडा टाकून लुटून नेला. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

घटनेची माहिती म्हाळुंगे पोलिसांना माहिती झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी तीन पथके तयार केली. तिन्ही पथकांनी आरोपींचा वेगवेगळ्या पातळ्यांवर शोध सुरू केला. दरोडेखोरांनी चोरलेला माल एका टेम्पोमधून नेला असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना दिली होती. टेम्पो मालक आणि खब-यांकडून म्हाळुंगे पोलिसांना माहिती मिळाली की, दरोडेखोर लुटलेला माल विकण्यासाठी यमुनानगर निगडी येथे गेले आहेत.

त्यानुसार पोलिसांनी यमुनानगर परिसरात सापळा लावला. लुटलेला माल एका ट्रान्सपोर्ट गोडाऊनमध्ये विकत असताना पोलिसांनी आरोपींची रंगेहाथ धरपकड केली. दरम्यान आरोपी आणि पोलीस यांच्यात झालेल्या झटापटीत दोन आरोपी पळून गेले. पोलिसांनी नऊ आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यामध्ये दोन महिला दरोडेखोरांचा सहभाग आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळींग, सुरेश यमगर, पोलीस अंमलदार चंदु गवारी, राजु कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, शिवाजी लोखंडे, संतोष काळे, हिरामन सांगडे, शरद खैरे, प्रितम ढमढेरे, जयकुमार शिकारे, साहेबराव टोपे, सोनम खंडागळे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.