पिंपरी : पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील भोसरी येथील पांजरपोळ येथे असलेल्या एसबीआयचे एटीएम सेंटर अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने फोडले. चोरट्यानी एटीएम मधून 22 लाख 95 हजार 600 रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. हा प्रकार आज (गुरुवारी, दि. 10) सकाळी उघडकीस आला.
या प्रकरणी अरविंद विद्याधर भिडे (58, रा. सहकार नगर, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांजरपोळ येथे पुणे-नाशिक महामार्गावर स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)चे एटीएम आहे. बुधवारी (दि. 9) रात्री साडेदहा ते गुरुवारी (दि. 10) सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडले.
मशीनमधून पैशांच्या चार कॅसेट चोरट्यांनी चोरून नेल्या. यामध्ये 22 लाख 95 हजार 600 रुपये रोख रक्कम होती. तसेच चोरट्यांनी 30 हजार रुपयांचे एटीएमचे नुकसान केले असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा कदम करीत आहेत.