नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. व्हीडिओ कॉन्फरन्सिंद्वारे संवाद महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिसा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सवांद साधला. कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना पंतप्रधान म्हणाले की, तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. आज चर्चेत जे राज्ये सहभागी आहेत, तेथे एकूण कोरोनाबाधितांपैकी 80 टक्के रुग्ण सापडले आहेत. तसेच 84 टक्के मृत्यू याच सहा राज्यांमधील आहेत. महाराष्ट्र आणि केरळमधील वाढती रुग्णसंख्या संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय ठरली आहे.
तज्त्रांनी असं म्हटलं होतं की जेथून कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली, त्याठिकाणी कोरोना परिस्थिती सर्वात आधी नियंत्रणात येईल. पण, असं होत नाहीये. महाराष्ट्र आणि केरळमधील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ही संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय आहे. असाच ट्रेंड जानेवारी-फेब्रुवारीमध्ये पाहायला मिळाला होता. परिस्थिती नियंत्रणात आली नाही, तर अडचणी वाढू शकतात. ज्या राज्यात रुग्ण वाढताहेत, त्यांनी प्रोअॅक्टिव पाऊलं उचलून, तिसरी लाट रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. नव्या-नव्या व्हेरियंटचा धोका वाढत आहे. त्यामुळे प्रभावी पाऊल उचलणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असं मोदी म्हणाले.
टेस्ट, ट्रॅक, ट्रिट आणि टिका याचा अवलंब करुन आपण कोरोना विरोधात लढा उभारु शकतो. आपल्याला मायक्रो कंटेनमेंट झोनवर अधिक लक्ष द्यायला हवं. ज्या जिल्ह्यात किंवा भागात संक्रमण जास्त आहे, त्याठिकाणी लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जाऊ शकते. तिसरी लाट येण्याआधीच ती थांबवावी लागेल. राज्य सरकारला फंड उपलब्ध करुन दिला जात आहे. नुकताच केंद्र सरकारने 23 हजार कोटी रुपयांचा कोविड रिलिफ फंड जाहीर केला आहे. याचा वापर आरोग्य सुविधा वाढवण्याचासाठी करण्यात यावा. विशेषत: ग्रामीण भागात आपल्याला जास्त काम करण्याची आवश्यकता आहे. तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असल्याचं तज्त्र म्हणत आहेत. त्यामुळे यासाठी आपल्याला अधिक खबरदारी घ्यायला हवी, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.