औरंगाबाद : घरची आर्थिक परिस्थिती, वडिलांचे निधन, संपूर्ण घराची पडलेली जबाबदारी आणि त्यातच मोठा भाऊ वाया चाललेला. भावाला मंदिरात नेवून आणल्यानंतर त्याच्यात सुधारणा झाल्याचे डोक्यात घेतल्याने लहान भाऊ श्रद्धेसोबत या अंधश्रद्धेच्या आहारी गेला आणि शंकर महादेवांच्या पिंडीवर स्वतःचा गळा चिरून रक्ताने अभिषेक केला.
हा अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद येथील पैठण शहरात घडला. नंदू घुंगासे या २५ वर्षीय युवकाने स्वतःच्या भावामध्ये सुधारणा व्हावी यासाठी जीवन संपविल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पैठण शहरातील गंगेश्वर महादेव मंदिरात स्वतःचा गळा चिरून कहारवाडा येथील नंदू घुंगासे या युवकाने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
नंदुची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची. त्यातच वडीलांचे काही वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आली. नंदुचा मोठा भाऊ बेफिकिर वृत्तीने वागत असल्याने नंदुवरच सर्व भार पडला. भावानेही कामधंदा करावा, असे त्याला वाटत होते.मोठ्या भावाला पुणे जिल्ह्यातील एका ठिकाणच्या महादेवाच्या दर्शनास नेल्यास भाऊ चांगला होईल, असे कोणीतरी सुचविले. त्याप्रमाणे त्याला दर्शनाला नेऊन आणले. त्यानंतर भावाच्या वागणुकीत फरक पडल्याचे जाणवले, महादेव आपल्या जीवनात काहीही करू शकतात ही अंधश्रद्धा नंदुच्या मनात दृढ झाली. त्यातून हे कृत्य केल्याचे पाेलिसांनी सांगितले. तपास पोलीस करत आहेत.