मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे खळबळ उडाली आहे. राज्य सरकार या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. निवृत्त न्यायमूर्तींमार्फत गृहमंत्र्यांची चौकशी केली जाणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक पार पडली. उमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जयंत पाटील, अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे मंत्री आणि नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अनिल परब हे या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांवर केलेले आरोप, फोन टॅपिंग आणि गोपनीय कागदपत्र लिक होणे, याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याबाबत लवकरच चौकशी आयोग नियुक्त केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या बैठकीत अॅटर्नी जनरल आशुतोष कुंभकोण यांच्याकडून कायदेशीर सल्ला घेण्यात आला. रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात सरकारची भूमिका काय असावी यावरही चर्चा झाली. त्यानंतर फोन टॅपिंग आणि गोपनीय कागदपत्र लिक होण्या संदर्भात निनावी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.