टोकियो : भारतीय पुरुष हॉकी संघानं 4 दशकांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदकावर भारताचं नाव कोरलं आहे. भारतीय हॉकी संघाने जर्मनीचा धुव्वा उडवत 5:4 असा विजय मिळवला आहे. यामुळे भारतीय संघाने मोठा इतिहास रचला आहे.
भारताने 1980 साली पहिल्यांदा हॉकीमध्ये पदक मिळवले होते यानंतर आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्य पदक मिळवले आहे. भारताने शानदार खेळी करत 5:4 ने जर्मनीचा पराभव केला आहे. जर्मनीविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय टीमने संघात कोणताही बदल केला नव्हता. मात्र आपल्या उत्तम खेळीने भारताला पदक मिळवून दिलं आहे.
भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमधील 41 वर्षापासूनचा पदकाचा दुष्काळ अखेर संपवला. कास्य पदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने जर्मनीचा पराभव करून देशाला ऐतिहासिक असा विजय मिळवला. याआधी भारताने ऑलिम्पिकमध्ये 1980 साली अखेरचे पदक जिंकले होते. तेव्हा मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले होते. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून भारताने पुन्हा एकदा हॉकीतील सुवर्णयुगाची सुरुवात केली आहे.
पाच ऑगस्ट रोजी झालेल्या कास्य पदकाच्या लढतीत जर्मनीने दुसऱ्याच मिनिटाला गोल करून धडाकेबाज सुरूवात केली. पहिल्या क्वॉर्टरचा खेळ संपला तेव्हा जर्मनीकडे 1-0 अशी आघाडी होती. या क्वॉर्टरच्या अखेरच्या काही मिनिटात जर्मनीला अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण भारताने त्यांना गोल करू दिली नाही. जर्मनीने दुसऱ्याच मिनिटाला गोल केल्याने भारताची बचाव फळी अलर्ट झाली.
दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारताने सुरुवातीच्या काही मिनिटात गोल करून १-१ अशी बरोबरी केली. पण जर्मनीने एकापाठोपाठ एक गोल करून 3-1 अशी मोठी आघाडी घेतली. भारत ही लढत गमवतोय की काय असे वाटत असताना पहिला हाफ संपण्याच्या आधी भारताने गोलचा धडाका लावला आणि 3-3 अशी बरोबरी केली.
तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये सुरुवातीलाच रुपिंदर पाल सिंहने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करून भारताला 4-3 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सिमरनजीतने भारतासाठी आणखी एक गोल करून 5-3 अशी आघाडी केली. तिसऱ्या क्वॉर्टरचा खेळ संपला तेव्हा भारताने आघाडी कायम ठेवली होती.