नाशिक फाटा ते खेड प्रवास होणार अवघ्या २० मिनिटांत
केंद्र सरकारच्या पुढाकाराने ‘एलिव्हेटेड’मार्गाची निर्मिती
पिंपरी : नाशिक फाटा ते राजगुरूनगर या २८ किलोमीटर लांबीच्या मार्गावर संपूर्ण उड्डाणपूल (एलिव्हेटेड) करण्यात येणार आहे. हा मार्ग एलिव्हेटेड झाल्यास हे अंतर केवळ २० मिनिटात पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे, अशी माहिती पुणे-नाशिक महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे, भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. त्यामुळे नाशिक फाटा ते राजगुरूनगर हा २८ किलोमीटरचा मार्ग सहा लेनचा दुमजली उड्डाणपुल करून १२ लेनचा करण्यासाठीच्या सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत दिल्या आहेत, असेही मेदगे यांनी म्हटले आहे.
नाशिक फाटा ते राजगुरूनगर या रस्त्याचे काम दोन टप्प्यात होणार होते. पहिला टप्पा नाशिक फाटा ते मोशी टोल नाका आणि दुसरा टप्पा मोशी टोल नाका ते चांडोली टोल नाका. दरम्यान, मोशी टोल नाका ते चांडोली टोल नाका या सहा पदरी रस्त्याला मान्यता देऊन त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. दरम्यानच्या काळात या डीपीआर प्रमाणे अनेक ठिकाणी व्हीयुपी, ओव्हरपास, मोशी आणि चाकण उड्डाणपूल अशी अनेक स्ट्रक्चर्स २८ किलोमीटर लांबीमध्ये होती. या एवजी हा संपूर्ण दुमजली कॉल केल्यास बारा व्हीयुपी, चार ओव्हरपास, चाकण मधील सव्वा दोन किलोमीटर व मोशी मधील तीन किलोमीटर असे दोन मोठे उड्डाणपूल. या सर्व बांधकामामुळे वाहतुकीच्या गतीवर परिणाम होऊन वाहतूक संथ गतीने झाली असती. ही बाब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लक्षात आणली गेली. त्यानंतर अनेकवेळा या रस्त्यावरील ताण कमी करण्यासाठी संपूर्ण एलिव्हेटेड मार्गाची मागणी झाली. इंद्रायणी नदी ते राजगुरूनगर या कामासाठी मंजूर होणारी निविदा प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेऊन एकंदरीत या संपूर्ण कॉरिडोरमध्ये उड्डाणपूल करण्यामुळे नाशिक, संगमनेर, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर येथील प्रवाशांना अत्यंत सहजपणे पुण्यात नाशिक फाट्या पर्यंत पोहोचता येणार आहे.
तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महापालिका, पीएमआरडीए, जिल्हा परिषद आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यातीन समन्वयाच्या अभावामुळे भूसंपादन आणि बाधित जागामालकांना मोबदला देण्याबाबत तात्काळ कार्यवाही होणे अपेक्षीत आहे.
पिंपरी-चिंचवडकरांची वाहतूक कोंडीतून सुटका…
चाकण परिसरातील वाढते औद्योगीकरण यामुळे दरवर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहनांची संख्या वाढत आहे. सध्या राजगुरुनगर ते नाशिक फाटा अंतर पार करण्यासाठी सुमारे अडीच ते तीन तास एवढा वेळ लागतो. मात्र हा संपूर्ण मार्ग एलिव्हेटेड केल्यास हे अंतर केवळ २० मिनिटात पूर्ण करता येणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाल्यास पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसराच्या वैभवात भर पडेल. तसेच वाहतूक कोंडी सुटेल. पुणे नाशिक महामार्गावरील प्रवास सुखद आणि जलद होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.