मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. महाविकास आघाडी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचे पहिले संकेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनीही सुचक ट्विट केल्याने खळबळ उडाली आहे.
महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री व युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे आघाडीमध्ये मोठ्या घडामोडी घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पर्यावरण मंत्री असा उल्लेख हटवला आहे. त्यावर त्यांनी फक्त युवा सेना अध्यक्ष आणि मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन अध्यक्ष एवढाच उल्लेख ठेवला आहे.
आदित्य यांच्या या ट्विटनंतर संजय राऊतांनीही सूचक ट्विट केलं आहे. ‘महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने,’ असं राऊतांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, शिंदे यांच्यासोबत चाळीसहून अधिक आमदार असल्याने पक्ष फुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मन वळवण्यासाठी मिलिंद नार्वेकरांना सुरतमध्ये चर्चेसाठी पाठवले होते. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शिंदे यांनी पुढं काय करायचं हे पक्क ठरवलं असून तसा निरोप ठाकरेंपर्यंत पोहचवला असल्याचे स्पष्ट झालं आहे. शिंदे यांनीच माध्यमांशी बोलताना याबाबत सूचक संकेत दिले आहेत.