खून झाल्याचे स्पष्ट झाल्याच्या पाच दिवसानंतरही मारेकरी मोकाट
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या हाती अद्याप काहीच धागेदोरे नाहीत
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील चिटफंड चालवणारे उद्योजकाचे अपहरण करुन खून झाला. ही घटना उघडकीस येऊन 5 दिवस झाले तरी पिंपरी चिंचवड पोलिसांना अद्याप मारेकऱ्यांचा शोध लावता आलेला नाही.
आनंद उनवणे असं खून झालेल्या उद्योजकाचं नाव आहे. याप्रकरणी अनोळखी तीन ते चार जणांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उनवणे यांना त्यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमधून बळजबरीने मोटारीत बसवून अपहरण केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. झटापटीत खाली पडलेला उनवणे यांचा चष्मा पोलिसांना सापडला आहे.
“उद्योजक आनंद उनवणे यांचा चिटफंड व्यवसाय होता. यामध्ये लाखो रुपये गुंतवले असल्याचं समोर आलं आहे. ३ फेब्रुवारीला अपहरण करण्यात आल. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी उनवणे यांना धमकावत चिटफंडमधील ४० लाख रुपये आणि सुमारे 25 ते 30 तोळे सोन्याचे दागिने मागवून घेतले. ही रक्कम आणि दागिने राहत्या घराच्या पार्किंगमध्ये उभी असलेल्या स्वतःच्या मोटारीत ठेवण्यास सांगितली. रक्कम ठेवल्यानंतर काही वेळाने अपहरणकर्त्यांनी मोटारीतील रक्कम घेऊन पळ काढला”.
पोलिसांना अद्याप आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आले नाही. उनवणे यांचा खून झाल्याचे 6 तारखेला स्पष्ट झाले. आज 11 तारीख उजाडली तरी अद्याप मारेकऱ्यांचा तपास लागलेला नाही. मारेकऱ्यांनी बारकाईने प्लॅन करुन गुन्हा केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच वेगवेगळी सहा पोलीस पथके तपास करत आहेत.