पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील सांगवी परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. आठ महिन्याचे थकीत घर भाडे मागण्यासाठी गेलेल्या घरमालकाच्या मुलाला टेरेस च्या चौथ्या मजल्यावरून ढकलून दिल्याची घटना समोर आली आहे.
सौरभ पोरे, असं जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरात तक्ररदार यांची चार मजली इमारत आहे. ते स्वतः त्या ठिकाणी राहत असून आरोपी कुटुंब देखील बऱ्याच दिवसांपासून तेथे राहत आहे. दरम्यान, आठ महिन्याचे भाडे थकल्याने दोन दिवसांपूर्वी घरमालकाचा मुलगा सौरभ आणि त्याचे वडील ते मागण्यासाठी गेले होते. तेव्हा, त्यांना भाडेकरूंनी चौथ्या मजल्यावरच्या टेरेसवर बोलावले. तिथे भाडेकरू कुटुंब आणि त्यांच्यात वाद झाले.
या दरम्यान भाडेकरूने घरमालकाचा मुलगा सौरभ याला खाली ढकलून दिले आहे, असं तक्रारीत म्हटलं आहे. यात, सौरभ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.