मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ईडीने थेट मुख्यमंत्र्यांंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर कारवाई केली आहे. ईडीने पाटणकरांची जवळपास 6.45 इतक्या कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे आता राज्यातील वातावरण तापलं असून यावर महविकास आघाडीमधील नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ईडीचा गैरवापर वाढत आहे, राजकीय हेतूने त्रास देण्यासाठी ही कारवाई झाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपकडून गैरवापर होत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
याआधी ईडी नावाची संस्था कोणालाच माहित नव्हती मात्र आता संस्था गावागावात पोहोचली असल्याचं पवार म्हणाले.
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही यावर बोलताना भाजपवर टीका केली आहे. महाराष्ट्र झुकणार नाही, आम्ही लढत राहणार आहोत. राजकीय सूडाच्या कारवाया अशाच असतात. भाजप राजकीय वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचं राऊत म्हणाले.
दरम्यान, ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील श्रीधर पाटणकर यांच्या ‘पुष्पक ग्रुप’ ची 6 कोटी 45 लाखांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. यामध्ये 11 फ्लॅटचा समावेश आहे.