मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी MPSC पूर्व परीक्षा आता 21 मार्चला घेतली जाणार असल्याचे राज्य सरकारने घोषित केले आहे. पूर्वनियोजित 14 मार्चला होणारी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला होता.
एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचा उद्रेक झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज परीक्षेची तारीख जाहीर करणार असल्याचं गुरुवारी संध्याकाळी केलेल्या संबोधनात सांगितलं होतं. मात्र हे सांगत असताना शासकीय यंत्रणा आणि तिच्या तयारीवर उद्धव ठाकरेंनी प्रकाश टाकला. आज तारीख जाहीर होऊन येत्या आठ दिवसांत ही परीक्षा होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आज परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 21 मार्चला ही परीक्षा होणार आहे.
या परीक्षेला संपूर्ण शासकीय यंत्रणा लागते. विद्यार्थ्यांची सोय करण्यापासून पेपर गोळा करुन गठ्ठे बांधण्यापर्यंत नियोजन करावं लागतं.त्यासाठी कर्मचाऱ्यांची तयारी करुन घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा राक्षस पुन्हा डोकं वर काढतोय. त्यामुळे जे कर्मचारी परीक्षेसाठी काम करणार आहेत त्यांची टेस्ट केली जाणं महत्त्वाचं आहे. ज्यांना लस दिली गेली तेच कर्मचारी यासाठी काम करतील, असा माझा आग्रहच नाही तर सूचना आहे. विद्यार्थी परीक्षेत आल्यानंतर कोणत्याही दडपणात राहू नयेत’, अशी सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.
काही जणांची अडचण वेगळी आहे. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला परवानगी दिली आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादाची अट येणार नाही. आपली थोडीसी गैरसोय झालीय याबाबत मी दिलगीरी व्यक्त करतो. हा चार-पाच दिवसांचा काळ लागतोय तो केवळ आपल्या पाल्याच्या आरोग्यासाठी लागत असल्याचं सांगत, मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना आवाहन केलं आहे.