माय लेकराचा खून; आईचा मृतदेह सासवड परिसरात तर मुलाचा मृतदेह कात्रज बोगद्याजवळ टाकला

0

पुणे : पुणे शहरातील धानोरी येथे रहाणाऱ्या मायलेकरांचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मारेकऱ्यांनी खून करुन आईचा मृतदेह सासवड येथे तर मुलाचा मृतदेह कात्रज नवीन बोगद्याजवळ टाकल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटना आज मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे मुलाच्या वडिलांचा अद्याप शोध लागलेला नाही. तर त्यांची ब्रिझा कारपुणे-सातारा रोडवर आढळली आहे.

मुलगा आयान शेख आणि आई आलिया आबिद शेख असे खून झालेल्याची नावे आहेत. याप्रकरणी सासवड पोलिसांनी अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयान व आबिदा हे पुण्यातील धानोरी परिसरात रहावयास होते. दरम्यान, आज सकाळी 7 सासवड-जेजुरी रोडवर असलेल्या खळद गावाजवळ एका हॉटेल शेजारी आबिदा या महिलेचा मृतदेह आढळून आला.

महिलेच्या अंगावर ट्रॅक पॅन्ट आणि टी-शर्ट होता. गळयावर धारदार हत्याराने वार केलेल्या खुना दिसत होत्या. दरम्यान, घटनास्थळावर कोठेही रक्ताचे डाग नव्हते. त्यामुळे खुन हा दुसरीकडे करून मृतदेह या ठिकाणी फेकून देण्यात आल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले होते.

कात्रज बोगदा दरी पुलाजवळ असणाऱ्या एका हॉटेलच्या परिसरात एका लहान मुलाचा मृतदेह असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या मुलाचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. सकाळी महिलेचा मिळालेला मृतदेह आणि या मुलाचे काहीतरी कनेक्शन असल्याचे समजले. त्यानुसार शोध सुरू केला असता महिला आणि हा मुलगा माय-लेक असल्याचे समोर आले आहे. त्यांची नावे निष्पन्न झाल्यानंतर हे दोघे धानोरी भागातील असल्याचे समोर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.