पिंपरी : शहरातील सायबर गुन्हेगारी वाढत यासाठी जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे. सायबर क्राइमच्या केसेस हाताळताना पोलिसांना सायबर क्राइम, फॉरेन्सिक शिकणे गरजेचे आहे. यासाठी सायबर क्राईम एक्सर्पटची पोलिसांना खूप गरज असल्याचे मत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथील सुमित ग्रुप ऑफ कंपनीतर्फे सीएसआर अंतर्गत पोलिसांना रुग्णवाहिका देण्यात आली. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे रुग्णवाहिकेची चावी सुपुर्द करण्यात आली. डिजिटल टास्क फोर्स आणि सुमीत ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने सायबर क्राईमचा तपास, सुरक्षा याबाबत चिंचवड येथील कुणाल प्लाझा येथे देण्यात येणा-या प्रशिक्षणाचा शुभारंभही प्रकाश यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. यावेळी उपमहापौर केशव घोळवे, पोलीस निरीक्षक सुनील पिंजण, प्रभाकर साळुंखे, ब्रिगडीयर महेश इराणा (निवृत्त), कायदेतज्ज्ञ नंदू फडके आदी उपस्थित होते.
औद्योगिक क्षेत्राने पोलिसांसोबत एकत्रित काम केले पाहिजे. एक जिद्दीने एक संकल्प करुन काम करणे आवश्यक आहे. सुमित ग्रुपने पोलिसांना सीएसआर अंतर्गत रुग्णवाहिका दिली आहे. बेवारस मृत देहाची विल्हेवाट लावताना रुग्णवाहिकीचे पोलिसांना मोठी मदत होणार आहे.
बेवारस मृत देहाची विल्हेवाट लावताना पोलिसांना खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लाग होते. सोईसुविधाच्या अभावी अपघातजन्य परिस्थिती हाताळताना आम्ही हतबल होतो. कंपनीतर्फे रुग्णवाहिके सोबत प्रशिक्षित दोन चालक, इंधनाचा खर्चही दिला जाणार आहे. ही सुविधा चोवीस तास सुरू असणार आहे. रुग्णवाहिकेवर पोलिसांचाच संपर्क क्रमांक दिला जाईल. अपघातावेळी रुग्णवाहिकेचा मोठा फायदा होईल, असे आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले.