पिंपरी : पतंगाच्या नायलॉन मांजाने दुचाकीस्वाराचा गळा कापला गेला. ही घटना आज (१४ जानेवारी) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास भोसरी येथे घडली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.
कैलास पवार असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. दुचाकीस्वाराच्या गळ्याला गंभीर दुखापत होऊन ८ टाके पडले आहेत. तसेच, मांजा बाजूला करताना त्यांची बोटं देखील कापली.
नायलॉन मांजावर बंदी असताना काही दुकानदार सर्रास विक्री करतात. मिळालेल्या माहितीनुसार, कैलास पवार हे दुचाकीवर भोसरीवरून नाशिक फाट्याकडे येत होते. तेव्हा लांडेवाडी येथील चढावरून दुचाकी येत असताना त्यांना गळ्याला काही तरी चावा घेत आहे असं वाटलं. त्यांनी गळ्याला हात लावला, तर गळा रक्तबंबाळ झाला होता.
मांजा हाताने बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता हाताची बोटं देखील कापली गेली. ही घटना सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली, अशी माहिती कैलास पवार यांनी दिली. पवार हे तातडीने रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून गळ्यावरील जखमेला ८ टाके टाकण्यात आले. या घटनेमुळे पुन्हा एकदा नायलॉन मांजा हा जीवावर बेतू शकतो हे अधोरेखित झालं आहे.