नवीन पोलीस आयुक्त घेणार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची ‘परेड

0

पिंपरी : पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तपदाची सूत्रे गुरुवारी नवीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी स्विकारली. यानंतर लगेच त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. नवीन ‘बॉस’ आल्यानंतर सर्व अधिकारी भेटून, आपला परिचय देण्यासाठी जात असतात. मात्र नवीन आयुक्त सर्व प्रथम गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांची ‘ओळख परेड’ घेणार आहेत.

अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीनी त्यांच्या कामाबद्दल विचारणा केली असता मला संपूर्ण आयुक्तालयाची माहिती घेऊ द्या, मग त्यावर बोलू, असे सांगितले. त्यानंतर काहीच वेळात त्यांनी कामाला सुरुवात केल्याचे चित्र स्पष्ट झाले. आयुक्त शिंदे यांनी पहिल्याच दिवशी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक बरखास्त केले. यामुळे पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे.

आयुक्तालयाची माहिती घेण्यासाठी वरिष्ठ सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी ओळख करुन चर्चा करतात. मात्र नवीन पोलीस आयुक्तांनी सर्व प्रथम गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे ठरवल्याचे बोलले जात आहे. त्यातच पहिल्याच दिवशी गुन्हे शाखेचे एक पथक बरखास्त केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

शहरातील वाढती गुन्हेगारी आणि पथकाकडून केले जाणारे काम याचा सविस्तर आढावा घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये, भेटीमध्ये नवीन पोलीस आयुक्त काही महत्वाचे निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे, मात्र ती नंतर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.