मुंबई : आगामी राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राज्यातले शिवसेनेचे सर्व आमदार हे मुंबईत दाखल झाले आहेत. या आमदारांची सोमवारी (दि. ६ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठक पार पडली.
“येणारी अडीच वर्ष ही आपलीच आहेत, आपल्याला सामान्य शिवसैनिकांना न्याय द्यायचाय!”, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी आमदारांना संबोधताना केले. आमदार फुटू नयेत म्हणून या बैठकीत उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना राज्यसभा निवडणूकीसंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टीही सांगितल्याचे सांगण्यात येत आहे.
“बघता बघता गेली अडीच वर्ष आपण यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. येणारी अडीच वर्ष ही सुध्दा आपलीच आहेत. येत्या काळात आपल्याला मतदानाचा हक्क बजावायचा आहे.
याकरिता कुणालाही घाबरायचं आणि जुमानायचं नाहीये. आपल्याला आपल्या सामान्य शिवसैनिकांना न्याय द्यायचाय. संजय पवार हे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते असून आपल्याला त्यांना राज्यसभेवर पाठवायचं आहे. त्यांच्या विजयासाठी आपल्याला लढायचं आहे.”, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.