वडगाव मावळ : मावळातील वाझे कोण आहे हे माहीत झाल्यावर जनतेने दीड वर्षांपूर्वीच त्यांना घरी बसवले आहे, असा खणखणीत प्रतिटोला लगावत आमदार सुनील शेळके यांनी माजी मंत्री बाळा भेगडे यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपाचे खंडन केले. वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी (6 जून) आयोजित मेगा पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“मावळच्या जनतेने सचिन वाझे कोण आहे, हे मागच्या दीड वर्षापूर्वीच ओळखले आणि दीड वर्षांपूर्वीच घरी बसवले आहे. हे सांगण्याची वेळ तुम्ही आज आणली. आमचे कार्यकर्ते प्रशासनाबरोबर हातात हात घालून काम करत आहेत. हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे कृपा करून तुमच्या सारख्या एजंट-दलालांनी आमच्या कार्यकर्त्यांवर टीका टिप्पणी करण्याचे काम करू नये.”
मावळ तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी हे कोणतीही विकास कामे न करता केवळ प्रसिद्धीसाठी महाविकास आघाडीवर खोटे- नाटे आरोप करतात असा घणाघाती आरोपही आमदार शेळके यांनी केला.
वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल शिंदे, राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, तळेगाव नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते गणेश काकडे, जिल्हा सरचिटणीस वैशाली दाभाडे, नगरसेविका मंगल भेगडे, संगीता शेळके, नगरसेवक अरूण माने यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना शेळके म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार जनहिताची कामे करत असून विरोधकांना या कामावर काहीही आक्षेप घेता येत नसल्यामुळे खोटे नाटे आरोप करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करीत आहेत.
तळेगाव दाभाडे, लोणावळा नगरपरिषद तसेच मावळ पंचायत समिती भाजपाच्या ताब्यात आहे. त्याठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार चाललेला आहे. त्याला आवर घालण्याऐवजी सत्ताधारी आमदार शेळके यांच्यावर वैयक्तिक आणि हीन पातळीचे बेच्छुट आरोप करण्यात गुंतले आहेत. त्यांनी आपल्या भ्रष्ट पदाधिका-यांची चौकशी करून त्यांना आवर घालावा.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये नागरीहिताची विकास कामे करत असताना सत्ताधारी पक्षाकडून स्वहित कसे साधले जाईल याचा विचार मोठ्या प्रमाणात केला जातो. असे निदर्शनास येत आहे. वेळ आल्यास निश्चितच जनतेसमोर याचा लेखाजोखा मांडण्यात येईल. असे मत शेळके यांनी व्यक्त केले.
यावेळी लोणावळा येथील भूखंडाच्या संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराची सविस्तर माहिती त्यांनी दिली. तसेच आश्चर्य म्हणजे ! वराळे गावामध्ये 13 दलित वस्त्या आहेत का? 48 लाखाची विहीर राज्यात पहिलीच असुन अशी विहीर वराळे हद्दीत इंद्रायणी नदी काठी खोदली.
हा प्रश्न उपस्थित पत्रकारांना त्यांनी केला. या सर्व दलित वस्त्यांवर विकास कामासाठी निधी उपलब्ध केला आहे. तो निधी कुठे गेला ? हा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. यावेळी स्वागत माजी सभापती विठ्ठलराव शिंदे यांनी केले