मुंबई : राज्यात अनलॉक करण्यावरुन सरकार मध्येच एकवाक्यता नाही. यामुळे जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला आहे. यावर विरोधकांनी सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी देखील ट्वीट करत सरकारवर या सगळ्या गोंधळावरून आगपाखड केली आहे.
भाजपा आमदार आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी या सगळ्या गोंधळावरून सरकारवर ताशेरे ओढले आहेत. “कोरोनाचा निर्णय म्हणजे खो-खो चा खेळ वाटला की काय सरकारला?” असा परखड सवाल दरेकरांनी उपस्थित केला आहे. तसेच, “तुमच्या अशा बालिशपणामुळे संपूर्ण महाराष्ट्राची जनता होरपळतेय. लॉकडाउनसारख्या निर्णयात एवढा गोंधळ?” असा देखील प्रश्न त्यांनी विचारला आहे. त्यामुळे अनलॉकच्या या गोंधळामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
गुरुवारी संध्याकाळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याचा निर्णय झाल्याची घोषणा केली. यावेळी ५ गटांमध्ये महाराष्ट्रातील जिल्हे आणि महानगरपालिका यांचं वर्गीकरण केलं असून त्यांची विभागणी ५ टप्प्यांमध्ये केल्याचं देखील त्यांनी सांगितलं. पहिल्या टप्प्यामध्ये अनलॉक आणि पुढच्या ४ टप्प्यांमध्ये टप्प्याटप्प्याने निर्बंध कठीण होत जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, त्यानंतर काही वेळातच राज्य सरकारने असा कोणताही निर्णय झालेला नसून अजून प्रस्ताव विचाराधीन असल्याचं जाहीर केलं.