पिंपरी (अमोल येलमार): पुणे पोलीस आयुक्त आणि पुणे ग्रामीण यांच्यातून विभक्त होऊन तयार झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अनेक समस्या आणि अडचणीतून पुढे जात आहे. यातील प्रमुख समस्या म्हणजे जागा आणि सुसज्ज इमारत. अनेक शाखांना अद्याप बसायला जागा नाही, तर पोलीस आयुक्तालय, अनेक पोलीस ठाणे, चौक्या भाडेतत्वावर आहेत.
यातील एक महत्वाची समस्या सुटण्याच्या मार्गावर आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय नवीन जागा जवळपास निश्चित झाली आहे. चिखली सेक्टर 13 येथे 4 हेक्टर जागा आयुक्तयासाठी हस्तांतरणासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्याची मंजुरी मिळाल्यानंतर या ठिकाणी पोलिस आयुक्तालयात स्वतःची इमारत तयार होणार आहे. सध्या या जागेचा ताबा पुणे प्रादेशिक विकास महामंडळाकडे आहे. येथील गायरान जमीन नवनगर विकास प्राधिकरणाच्या ( सध्या पीएमआरडीए) ताब्यात होती. मात्र, ती जिल्हाधिकारी अंतर्गत येत असल्याने त्याचा प्रस्ताव तेथून शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
पिंपरी चिंचवड आयुक्तालय स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा काही दिवस महापालिकेच्या ऑटॉक्लस्टर येथे कामकाज सुरू झाले. त्यानंतर जागेची शोधाशोध करता , प्रेमलोक पार्क येथील शाळा पोलीस आयुक्तलया साठी देण्यात आली. पोलीस मुख्यालय, पोलीस उपायुक्त व इतर अधिकारी यांच्यासाठी अन्य ठिकाणी कार्यालय आहे. हे सर्व एकाच ठिकाणी यावे, यासाठी नवीन जागेचा शोध सुरू होता.
2018 मध्ये पिंपरी चिंचवड स्वतंत्र आयुक्तालय निर्माण झाले. पहिले आयुक्त होण्याचा मान आर. के. पद्मनाभन यांना मिळाला. त्यानंतर दुसरे आयुक्त म्हणून संदीप बिष्णोई यांची नियुक्ती झाली. यानंतर तिसरे आयुक्त कृष्ण प्रकाश हे रुजू झाले. त्यांची बदली नुकतीच झाली असून त्यांच्या जागी अंकुश शिंदे यांची नियुक्ती झाली. अवघ्या साडे तीन वर्षात चार आयुक्त आले.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना काम करताना त्यांच्या समोर अनेक समस्या आहेत. मनुष्यबळ, वाहन, साधनसामग्री यासारखे आणि पोलीस आयुक्तालय व मुख्यालय यासाठी स्वतःची जागा आणि इमारत. याचबरोबर कर्मचारी आणि अधिकारी यांना राहण्यासाठी निवास या सारख्या अनेक समस्या समोर आहेत. यातच पोलीस आयुक्तालयाच्या जागेचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. विभागीय आयुक्तांनी सेक्टर 13 मधील 10 एकर जागा निश्चित केली असून ती मिळण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. यामुळे लवकरच शासन याबाबत निर्णय घेऊन जागा मंजुरी देईल असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.