पोलिसांनी जप्त केले चोरीला गेलेले, हरवलेले 69 मोबाईल

0

पिंपरी : चोरीला गेलेल्या मोबाईलचा तांत्रिक कौशल्यावर आधारित तपास करत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकने सात लाख 10 हजार रुपये किमतीचे 69 मोबाईल जप्त केले. या कामगिरीमुळे एमआयडीसी भोसरी आणि सांगवी पोलीस ठाण्यातील नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल चोरीचा वाढत्या गुन्ह्यांबाबत प्रकाशाच्या सूचना दिल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकने समांतर तपास केला. चोरीला गेलेल्या मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण करत आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 69 मोबाईल फोन जप्त केले. त्यातील 23 मोबाईल फोन बाबत जबरी चोरीचे आठ आणि घोरपडीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. यामध्ये एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील सात, तर सांगवी पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपी मागील काही दिवसांपूर्वी एका ठिकाणी काम करायचे. काम सोडून त्यांनी मोबाईल चोरीचे प्रकार सुरू केले. तिघांनी मिळून पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून 69 मोबाईल फोन चोरी केले. त्यातील 23 मोबाईल फोन प्रकरणी दाखल असलेले नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. तर उर्वरित 46 मोबाईल फोनच्या मूळ मालकांचा शोध सुरू आहे. त्यातील 18 मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार (सायबर गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख, पोलीस अंमलदार फारुक मुल्ला, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, स्वप्नील महाले, मारुती जायभाय, विशाल भोईर व तांत्रिक विश्लेषक नागेश माळी यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.