मुंबई : राज्यातील पोलिसांवर गेल्या काही दिवसांपासून हल्ले वाढत असून हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. गेल्या तीन महिन्यांत ३० पोलिसांवर हल्ले झाल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी (ता. १५) विधानसभेत दिली. या वाढत्या हल्ल्यांमुळे पोलिसांचे मनोधैर्य कमी होत असून ते वाढवण्याची गरज असल्याचे मत त्यांनी या वेळी अधोरेखित केले.
पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली. राज्यातील पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पॉइंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला. या वेळी गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांवर होत असलेल्या हल्ल्यांची त्यांनी यादीच वाचून दाखवत सभागृहाचे लक्ष वेधले.
राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलिस चोवीस तास कार्यरत असतात. अनेक वेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत.
पोलिसांवर हल्ल्याची प्रवृत्ती बळावू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता आहे. या हल्ल्यांमुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर सरकारने जरब बसवण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. या चर्चेमध्ये इतर सदस्यांनी ही सहभाग नाेंदवला आणि यावर तातडीने कारवाईची मागणीही त्यांनी केली.