हवाला एजंटशी संगनमत करुन पोलिसांनीच लुटले 45 लाख रुपये

0

पुणे : पुण्यातील हवाला एजंटशी संगनमत करुन नाशिक येथून मुंबईला हवालाची ५ कोटी रुपयांची रक्कम घेऊन जाणार्‍या मोटारीला भिवंडीजवळ अडवून दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तिघा पोलिसांनी ४५ लाख रुपये लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणात नारपोली पोलिसांनी पुण्यातील एका हवाला एजंटला पकडल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे.

नारपोली पोलिसांनी या तीन पोलिसांना ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन पाटील यांनी दिली आहे. गणेश बाळासाहेब शिंदे (३५, रा. वानेवाडी, बारामती), गणेश मारुती कांबळे (३४, रा. डाळींब, ता. दौंड) आणि दिलीप मारोती पिलाने (३२, रा. महमंदवाडी) अशी दत्तवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांची नावे आहेत. आता त्यांना अटक करण्यात आली आहे. बाबूभाई राजाराम सोलंकी (४७, रा. बालाजीनगर,पुणे) असे अटक केलेल्या हवाला एजंटचे नाव आहे. याप्रकरणी एका ५९ वर्षीय व्यापाऱ्याने नारपोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना नाशिक -मुंबई महामार्गावरील भिवंडी येथील हायवे दिवे गावातील इंडियन ऑयल पेट्रोल पंपासमोर समोर ८ मार्च रोजी सकाळी पावणे सात ते आठ वाजेच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा स्टिलचा व्यवसाय आहे तर सोलंकी हा त्यांचा मेव्हणा आहे. सोलंकी आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी एकमेकांच्या परिचयाचे आहेत. सोलंकी हा हवाला एजंट म्हणून काम करतो. फिर्यादी हे हवालाचे पैसे घेऊन मुंबईला जाणार असल्याची माहिती सोलंकी याला होती. त्याने ही बाब तिघा पोलिसांना सांगितली. चौघांनी मिळून फिर्यादीला लुटण्याचा कट रचला. चौघेही जण भिवंडीला गेले. तेथे ते इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ दबा धरुन बसले होते.

सोलंकीने फिर्यादीची मोटार आल्याचा इशारा केल्यावर तिघांनी मोटार अडविली. त्यांना बाजूला घेतले. आम्ही पोलीस आहोत, तुमच्या गाडीत मोठी रोकड आहे, तपास करायचा आहे, अशी बतावणी करुन ५ कोटी रुपयांच्या रोकडमधील ४५ लाख रुपये काढून घेतले. त्यानंतर तेथून या तिघांनी पळ काढला.

फिर्यादी हे पुढे मुंबईला गेले. त्यांनी संबधितांना पैसे दिले. नाशिकमधील ज्या उद्योजकाचे पैसे होते, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी १० मार्च रोजी नारपोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक चेतन पाटील.यांनी केलेल्या तांत्रिक तपासात घटनेच्या ठिकाणी सोलंकी याचा मोबाईल सक्रीय असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी सोलंकी याला पुण्यातून ताब्यात घेतले. त्याच्याकडील चौकशीत या तिघा पोलिसांचे हे कृत्य उघडकीस आले. त्यानंतर या तिघांचा शोध घेऊन आज (रविवारी) सकाळी तिघांना ताब्यात घेण्यात आले आणि अटक करण्यात आली.

या तिघांची ७ मार्चला साप्ताहिक सुट्टी होती. ते त्यादिवशी रात्री ११ वाजता पुण्याहून निघाले. पहाटे ४ वाजता भिवंडीत पोहचले. तेथे सकाळी ८ वाजेपर्यंत दबा धरुन बसले. त्यानंतर त्यांनी परमार यांना अडवून ४५ लाख रुपये लुटले. चौघांनीही प्रत्येकी ९ लाख रुपये वाटून घेतले. त्यानंतर ते पुन्हा तातडीने पुण्यात आले. तिघे जण काही घडलेच नाही, असे दाखवून ८ मार्च रोजी ड्युटीवर हजर झाले. ९ मार्च रोजीही ते कामावर होते. १० मार्च रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर ते तिघे फरार झाले होते. पण नारपोली पोलिसांनी तिघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.