पुणे : वानवडी परिसरात तरुणीने केलेल्या आत्महत्या प्रकरण पुणे पोलिसांनी दाबण्याच काम करु नये. या प्रकरणात तात्काळ कारवाई करुन सत्य बाहेर आणले पाहिजे अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे महानगरपालिकेला भेट दिली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आज गेल्या चार वर्षातील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महापालिकेला भेट दिली. याचनंतर फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये त्यांना वानवडी येथील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीशी संबंधित एका मंत्र्याचं नाव गोवलं जात असल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, “मी सुद्धा या प्रकरणाची बातमी वाचली. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. समाज माध्यमांमध्ये काही क्लिप फिरत आहेत असंही मला सांगण्यात आलं आहे. पुणे पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. यामधील सत्य काय आहे हे जनतेसमोर आणलं पाहिजे. एका तरुणीची अशाप्रकारे झालेली आत्महत्या आणि त्याच्या भोवती तयार झालेलं संक्षयाचं वर्तुळ आहे ते दाबण्याचा प्रयत्न पोलिसांनी करु नये. त्यासंदर्भात सत्य पोलिसांनी बाहेर आणावं,” असं मत व्यक्त केलं.