पोलिसांनी आपले काम करावे; नको त्या विषयात लक्ष नको : पोलीस आयुक्त चौबे

0

पिंपरी : पोलिसांनी पोलिसांचे कर्तव्य पार पाडावे, नको त्या विषयात, नको तेवढे लक्ष घालून बदनाम होऊ नये. सर्व सामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकून, त्यांना योग्य न्याय द्यावा, अशा शब्दात नवनियुक्त पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पहिल्याच मीटिंग मध्ये सर्व अधिकाऱ्यांना सुनावले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त म्हणून विनयकुमार चौबे यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, त्यांनी सोमवारी (१९ डिसेंबर) शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त यांची बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे हे उपस्थित होते.

चार दिवसांपूर्वी विनयकुमार चौबे यांची पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर मावळत्या पोलीस आयुक्त विशेष महानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्याकडून चौबे यांनी शहरातील घडामोडींचा अधिकाऱ्यांचा आणि एकंदरीत कार्यपद्धतीचा आढावा घेतला आहे.

पदभार घेतल्यानंतर पहिल्या-वहिल्या बैठकीतच नवनियुक्त आयुक्त चौबे यांनी अत्यंत सौम्य शब्दात सगळ्यात अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. नागरिकांची गर्दी आयुक्तांच्या दालना बाहेर होत असल्याने एक तर पोलीस ठाणे स्तरावर या नागरिकांचे ऐकून घेतले जात नसावे किंवा त्यांना पोलीस ठाण्यात जाण्याऐवजी थेट आयुक्तांची भेट घ्यावी असे का वाटते याचा विचार आपण सर्वांनी करण्याची गरज असल्याचे मत सोमवारी झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्त चौबे यांनी व्यक्त केले.

एखादा नागरिक पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला आल्यावर त्याचे म्हणणे काय आहे हे ऐकून घेऊन कायद्याला धरून असलेल्या बाबीनुसार तत्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे. आपण पोलीस होण्यापूर्वी आणि पोलीस झाल्यानंतर आपल्या झालेला बदल सामान्य नागरिकांवर होता कामा नये हे आपण लक्षात ठेवा, असे सांगतानाच आयुक्तालयातील तीन जागांसाठी ८० अधिकारी प्रयत्न करतात याचा अर्थ पिंपरी-चिंचवड मध्ये सर्वच काही अलबेल आहे असे नाही असे मी मानतो अशी टिपणी करण्यासही चौबे यावेळी विसरले नाहीत.

नव्याने विकसित असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांच्या आयुक्तालय म्हणून आपणा सर्वांकडून खूप अपेक्षा आहेत प्रत्येकाची कार्यपद्धती भिन्न असते मात्र आपल्या कार्यपद्धतीचा नागरिकांवर विपरीत परिणाम होता कामा नये. यापुढे आपण सर्वांनी लक्षात ठेवावे. आपण स्वच्छ आणि चांगले राहिलो तर नागरिक देखील त्याचप्रमाणे वागतील आणि शहर स्वच्छ आणि चांगले राहील हे आपण लक्षात घेतले पाहिजे असे देखील चौबे यावेळी म्हणाले.

शासनाने आयुक्त अप्पर महासंचालक दर्जाचे करतानाच यासाठी पोलीस सहआयुक्त म्हणून विशेष महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांची देखील नियुक्ती केली आहे. आयुक्तालय स्थापन करताना सहआयुक्त पद निश्चित करण्यात आलेले नाही. मात्र, तीन वर्षांपूर्वी शहरासाठी विशेष महानिरीक्षक प्रकाश मुत्त्याळ यांची सहआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा शहरासाठी सहयुक्त म्हणून लोहिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे शहरात भारतीय प्रशासकीय सेवेचे (आयपीएस) तीन अधिकारी असणार आहेत.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची ओळख सध्या वेगळ्याच पद्धतीने राज्यात आहे, ती आपण चांगली करायची आहे. पोलिसांनी वादग्रस्त जमिनीचे विषय, ताबा यामध्ये पडण्याची गरज नाही. शहरातील अवैध व्यवसायावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आपले काम सोडून नको त्या विषयात कोणी पडू नये. आपले काम सोडून इतर कामात लक्ष असल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.