पुणे : पुणे पोलिसांनी बिहार राज्यात मोठी कारवाई करुन मोबाईल शॉपीमध्ये चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून तब्बल 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मोबाईल शॉपी फोडीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
उरळी देवाची येथील स्वप्नील सुभाष परमाळे यांच्या न्यु साई मोबाईल दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी आतील 19 लाख रुपये किंमतीचे 102 मोबाईल चोरुन नेले. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 23 ऑक्टोबर रोजी घडला होता. पोलिसांनी दुकानातील आणि परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या चारचाकी गाडी बाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी साहिल अनिल मोरे (20, रा. देशमुखवाडी, शिवणे) याला ताब्यात घेतले. न्यायालयाकडून त्याची पोलीस कोठडी घेऊन सखोल चौकशी केली.
चौकशी दरम्यान आरोपी साहिल मोरे याने त्याचे साथिदार संकेत निवगुणे, लक्ष्मण उर्फ आण्णा जाधव, संतोष मोरे, गजानन मोरे, पोपट धावडे यांची नावे सांगितले. हडपसर पोलिसांनी संकेत निवगुणे (22 रा. वारजे माळवाडी) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. गुन्ह्याचा मुख्यसुत्रधार आण्णा जाधव हा चोरीचा मुद्देमाल घेऊन बिहार राज्यातील छपरा जिल्ह्यातील एकमा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
हडपसर पोलिसांचे एक पथकाने बिहारमध्ये जाऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरीच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावणारा आरोपी मोनुसिंग याच्या घरावर छापा मारला. पोलिसांनी मुख्यसुत्रधार लक्ष्मण उर्फ आण्णा जाधव याला 97 मोबाईलसह ताब्यात घेतले. तीन आरोपींची पोलीस कस्टडीत चौकशी केली असता आरोपींनी त्यांचे फरार साथिदार साहिल मोरे, गजानन मोरे, प्रभात मोरे, पोपट धावडे यांनी मिळून हडपसर, कोंढवा, धायरी, चतुश्रृंगी भागातील मोबाईल शॉपीमध्ये चोरी केल्याचे उघडकीस आले. आरोपी चोरीचा मुद्देमाल आण्णा जाधव याला देत होते. जाधव हा चोरीचा मुद्देमाल मोनूसिंग याला विकत होता. मोबाईल विकून मिळालेल्या पैशांपैकी 40 टक्के रक्कम आरोपींना मिळत होती.
हडपसर पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 97 मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली इंडिका कार, होंडा ॲक्टीवा दुचाकी
असा एकूण 22 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार आण्णा जाधव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार
असून वेगवेगळ्या 13 गुन्ह्यात पोलीस त्याचा शोध घेत होते.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक गुन्हे दिगंबर शिंदे, पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, सचिन जाधव, समिर पांडुळे, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सुरज कुंभार, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, अतुल पंधरकर यांच्या पथकाने केली.