उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रश्नावर देहू संस्थानचे अध्यक्ष भडकले
पत्रकार परिषद सोडून जाण्याचा प्रयत्न
पिंपरी : देहू येथे दोन दिवसांपूर्वी जाणून बुजून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपमान करण्यात आल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. या मुद्दयावर आज देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांना विचारणा केली असता ते चांगलेच भडकले.
आमदार अण्णा बनसोडे यांनी देहू संस्थानला 22 लाख रुपयांचे चांदीचे पूजा साहित्य दिले आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी आमदार बनसोडे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी नितीन महाराज मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यास संधी दिली नाही. यावरून विचरणा करण्यात आली. त्यावेळी ते चांगलेच भडकले. ऐवढेच नाही तर पत्रकार परिषद सोडून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्रकार परिषदेत उपस्थित असणारे माजी आमदार विलास लांडे यांनी समजूत काढल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बसले.
आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडून 22 लाखांच पूजा साहित्य देहु संस्थानला भेट दिली. यामध्ये चांदीच सिंहासन, अभिषेख पात्र, मखर, पूजा आदी असणार आहे. शनिवारी पूजेच्या साहित्याची भव्य दिंडी काढण्यात येणार असल्याचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले.